खेड तालुक्यातील बुडून मृत्यू झालेल्या घटनांमधील घटनास्थळ. pudhari photo
रत्नागिरी

Khed News | खेड तालुक्यात विसर्जनावेळी दुर्दैवी दुर्घटना; चौघांचा बुडून मृत्यू

Khed News| दुर्घटनांमुळे तालुक्यात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

चाकण : गणेशोत्सवाच्या जल्लोषात खेड तालुक्यात दुर्दैवी घटना घडली असून, वाकी बुद्रुक, बिरदवडी आणि शेलपिंपळगाव येथे विसर्जनावेळी चौघे बुडून मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनांमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवारी (दि. ६) गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असताना काही ठिकाणी सुरक्षेची काळजी न घेतल्याने जीवितहानी झाली.

वाकी बुद्रुक : दोन तरुणांचा भामा नदीत मृत्यू

महात्मा फुले चौक, चाकण येथील शिवशाही करिअर अकॅडमीचे काही विद्यार्थी गणपती विसर्जनासाठी वाकी खुर्द हद्दीतील घोडदरी भागात, भामा नदीच्या काठावर गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास विसर्जनावेळी एक तरुण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या आणखी एका तरुणाला बुडणाऱ्याने मिठी मारल्याने दोघेही पाण्यात गेले.

या घटनेत अभिषेक अशोक भाकरे (वय २१, रा. कोयाळी ता. खेड) व अनंत जयस्वाल (वय २०, रा. चाकण) यांचा मृत्यू झाला. एकाचा मृतदेह तत्काळ बाहेर काढण्यात आला, मात्र दुसऱ्याचा मृतदेह उशिरापर्यंत मिळाला नव्हता. चाकण रेस्क्यू टीम, एमडीएफ व अग्निशमन दल शोधकार्य करत होते.

बिरदवडी : विहिरीत विसर्जनावेळी अपघात

बिरदवडी (ता. खेड) येथे गणेश विसर्जन करताना संदेश पोपट निकम (वय ३६, मुळे वस्ती, मूळ रा. सिन्नर जि. नाशिक) यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ते पोहण्यात तरबेज असूनही अचानक पाण्याच्या ओढीला सापडून मृत्यू झाला.

शेलपिंपळगाव : आणखी एक दुर्घटना

शेलपिंपळगाव (ता. खेड) येथेही विसर्जनावेळी एक युवक बुडाल्याची माहिती मिळाली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल होऊन शोधकार्य सुरू झाले.

धरणातून विसर्गामुळे धोका

दरम्यान, भामा आसखेड धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीला प्रचंड प्रवाह होता. प्रशासनाने वारंवार सूचना करूनही काही ठिकाणी नागरिकांनी थेट नदीपात्रात विसर्जन करण्याचे धाडस केले. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्व घटनांमुळे उत्सवाचे वातावरण शोकाकुल झाले असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT