खेड: खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने आपला गड राखत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत 'क्लीन स्वीप' केला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे खेडच्या राजकारणात महायुतीचे एकहाती वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, महाविकास आघाडीला साधे खातेही उघडता आले नाही.
महायुतीचा विजय: २१-० (पूर्ण बहुमत)
नवनियुक्त नगराध्यक्षा: माधवी बुटाला
पक्षनिहाय मिळालेल्या जागा: शिवसेना (१७ जागा), भाजप (०३ जागा), आरपीआय (०१ जागा सहयोगी
२ डिसेंबर रोजी झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष खेडच्या निकालाकडे लागले होते. मात्र, निकाल जाहीर होताच चित्र स्पष्ट झाले. महायुतीच्या लाटेसमोर विरोधकांचा टिकाव लागला नाही. शिवसेनेने १७ जागांवर तर भारतीय जनता पक्षाने ३ जागांवर विजय मिळवला आहे. या एकतर्फी विजयामुळे खेड नगरपरिषदेत आता पूर्णपणे महायुतीची सत्ता असणार आहे.
या विजयाचे मुख्य शिल्पकार गृहराज्यमंत्री योगेश कदम मानले जात आहेत. त्यांच्या नियोजित रणनीतीमुळे आणि विकासकामांच्या जोरावर मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केले. "जनतेने विकासाच्या राजकारणाला साथ दिली असून हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे," अशी भावना महायुतीकडून व्यक्त केली जात आहे.
या घवघवीत विजयामुळे माधवी बुटाला यांची खेडच्या नगराध्यक्षा पदी वर्णी लागली आहे. त्यांच्या रूपाने शहराला एक सक्षम महिला नेतृत्व मिळाले असून, आगामी काळात शहराच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत संपूर्ण खेड शहर भगवेमय केले. "एकच वादा, योगेश दादा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.