खेड : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी भरतीसाठी राबवण्यात येत असलेल्या परीक्षा प्रक्रियेत रविवारी तांत्रिक अडचण आल्याने खेडमधील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. यावेळी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, केंद्र संचालकांनी पोलिसांच्या मदतीने परिस्थिती हाताळली. या केंद्रावरील उमेदवारांच्या परीक्षा पुन्हा घेणार असल्याचे बँकेच्या संचालक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा देण्यासाठी सुमारे नऊशे उमेदवार जिल्ह्यातून तसेच जिल्हा बाहेरून खेडमध्ये आले होते. परंतु जिल्हा बँकेने परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमलेल्या यंत्रणेत तांत्रिक अडचण आल्याने उमेदवार परीक्षार्थी यांना ताटकळत रहावे लागले. त्यामुळे हाल झाल्याने केंद्र परिसरात गोंधळ उडाला. खेड येथील घरडा कॉलेजमध्ये सकाळी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांना अखेर दुपारी सांगण्यात आलं की आज परीक्षा होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले की, सकाळी 9 वाजल्यापासून घरडा कॉलेजमधली इंटरनेट सेवा बंद पडली होती. घरडा कॉलेज हे तांत्रिक कॉलेज असून सुद्धा तेथे इंटरनेटचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे आजची परीक्षा पुढे घेण्यात येणार आहे. एका बॅचचे 270 उमेदवार असे सुमारे 900 उमेदवार परीक्षार्थी या केंद्रावरची परीक्षा नियोजन जिल्हा बँकेच्या वेबसाईटवर आणि उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवर कळवण्यात येणार आहे.
चिपळूण येथे तसेच आंबव पॉलिटेक्निक कॉलेज, खेडमधील ज्ञानदीप येथे देखील परीक्षा केंद्रावर या परीक्षा होत आहेत. तसेच न झालेल्या परीक्षेचे नियोजन घरडा कॉलेजमध्ये पुढील दोन दिवसात जाहीर करण्यात येईल, असेही जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले आहे.