रत्नागिरी

Khed Accident | अस्तान सीमेजवळ एसटी बसला अपघात; नदीत कोसळण्यापासून बस थांबली, सहा प्रवासी सुखरूप!

पुढारी वृत्तसेवा

खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अस्तान सीमेजवळ खेड आगाराच्या वडगाव–खेड मार्गावरील एसटी बसला रविवारी दुपारी अपघात झाला. अपघातानंतर बस नदीच्या दिशेने गेली; मात्र नदीत कोसळण्यापासून बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील सहा प्रवासी सुदैवाने सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती आहे.

खेड आगाराची MH 14 BT 2756 क्रमांकाची एसटी बस वडगावहून खेडच्या दिशेने येत होती. रविवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अस्तान सीमेजवळ पुलाच्या अलीकडे बसला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या दुर्घटनेत बसमधील सहा प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. बस नदीत कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र बस नदीत जाण्यापासून थांबल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या अपघातामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक ग्रामीण मार्ग अरुंद असून रस्त्यांच्या कडेला आवश्यक बाजूपट्ट्या, नाले तसेच संरक्षक कठड्यांची पुरेशी व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे.

विशेषतः पूल व नदीपात्रालगतच्या रस्त्यांवर सुरक्षाकठडे आणि अन्य आवश्यक उपाययोजना असणे गरजेचे आहे. एखाद्या वाहनाचा ताबा सुटल्यास अशा ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने ग्रामीण भागातील रस्त्यांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संबंधित यंत्रणेकडून तपास करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT