दापोली-मंडणगड : कोकण आणि बांबू शेती हे समीकरण गेले अनेक वर्षाचे आहे, परंतु गेल्या काही वर्षांत कोकणातील नवीन पिढीने या शेतीकडे पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील केळशी येथील भावेश कारेकर यांनी मित्रमंडळींच्या सहाय्याने तब्बल 50 एकरांवर मंडणगड तालुक्यातील वडवली गावात बांबू शेती उभी करून एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.
आयटी क्षेत्रातील उच्च पदावरील नोकरी सोडून त्यांनी दापोली,मंडणगड या आपल्या तालुक्यात शेती, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धनावर काम करण्याचा ध्यास कारेकर यांनी घेतला आहे. बांबूपासून काडीकाम, फर्निचर, बांधकाम साहित्य, पेपर, वस्त्रनिर्मितीपासून ते बायो-चार व बायो-एनेर्जीपर्यंत शंभरहून अधिक उत्पादने तयार होऊ शकतात. यामुळे ग्रामीण भागात लघुउद्योग उभारण्याची मोठी संधी निर्माण होते. भविष्यात प्रक्रिया केंद्रे व क्लस्टर उभारून स्थानिक युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कारेकर यांचे उद्दिष्ट आहे. आगामी काळात कारेकर यांचे ध्येय कमीतकमी 1000 एकरांवर बांबू शेती विस्तारण्याचे आहे. यामुळे शेकडो स्थानिकांना थेट रोजगार मिळेल, कोकणात हरित अर्थव्यवस्था निर्माण होईल आणि बांबू आधारित टिकाऊ उद्योगांना गती मिळेल. कारेकर यांचा हा उपक्रम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून कोकणाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला, पर्यावरणाला आणि समाजजीवनाला नवी दिशा देणारा ठरू शकतो.
बांबू हा वेगाने वाढणारी, कमी पाणी लागणारी आणि मातीची धूप रोखणारी वनस्पती आहे. कार्बन शोषणाची क्षमता इतर झाडांच्या तुलनेत जास्त असल्याने हवामान बदलावर नियंत्रण मिळविण्यात बांबूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोकणातील टेकाडे व मोकळी पडलेली जमीन या बांबू लागवडीमुळे हरित पट्ट्यांमध्ये रूपांतरित होऊ शकते.