खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यात अद्याप सुरू असलेली पाणी गळती. Pudhari File Photo
रत्नागिरी

कशेडी बोगद्यातील गळती निघता निघेना!

दुरुस्तीवर केलेला करोडोंचा खर्च पाण्यात; बोगद्यातील विहिरीकडे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा
अनुज जोशी

खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी येथील दोन्ही बोगद्यांतील पाणी गळती निघता निघेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांसमोर ही गळती थांबवण्याचे आव्हान आहे. येत्या दोन महिन्यांत ही गळती बंद करू, असा विश्वास विभागाला आहे. करोडो रुपयांचा खर्च करूनही गळती थांबत नसल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कशेडी बोगद्याच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, उन्हाळ्यातही बोगद्यात पाणी पाझरत असून, ही गळती थोपवण्यासाठी सातत्याने दुरुस्तीवर करोडोंचा खर्च करूनही राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागचा प्रयत्न फोल ठरत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत आहे. कशेडी बोगद्याच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. परंतु, येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तज्ज्ञांनी अभियांत्रिकी कौशल्य पणाला लावून काम केले असले तरी बोगद्यातून पाण्याची गळती थांबत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गळती रोखण्यासाठी ‘ग्राऊटिंग’ तंत्रज्ञानाचा वापरही फोलच ठरला आहे. त्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला आहे. याला संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरावे, अशी मागणी होत आहे. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राऊंटिंगचा अवलंब केला. यासाठी 20 हजाराहून अधिक सिमेंट बॅगांचा वापर केल्यानंतर गळती थोपवण्यात यश आल्याचा दावाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून केला जात होता.

मात्र बोगद्यात गळतींचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महामार्ग बांधकाम खात्याची डोकेदुखी वाढली आहे. बोगद्यातून गळती लागल्यानंतर मुंबई आयआयटीचे प्रा. एस. के. यांनीही बोगद्याची पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग खात्याला सूचनाही केल्या होत्या. तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर बांधकाम विभागाने गळती रोखण्यासाठी उपाययोजना केली मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आता कडक उन्हाळा असूनही बोगद्यात गळती सुरूच असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गिकेत देखील गळती लागल्याचे दिसून येत आहे. या गळतीवर ठोस उपाययोजना व्हावी अशी मागणी आता वाहन चालकांमधून जोर धरू लागली आहे.

आयआयटीच्या अभियंत्यांकडून पाहणी; उपाय सुरू

महामार्गावरील या दोन्ही बोगद्यांत गळतीच्या ठिकाणी राष्ट्रीय बांधकाम विभागाकडून गळती थांबवण्यासाठी काम सुरू आहे. जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये संपूर्णपणे गळती बंद होईल. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई आयआयटीचे अधिकारी डी. एन. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. तसेच विद्युत पुरवठ्याचे काम देखील अंतिम टप्प्यात असून एक ते दोन महिन्यात बोगद्यातील जवळपास सर्वच कामे मार्गी लागतील, अशी माहिती अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.

कशेडी बोगद्यावरील विहीर नजरेआड...

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा हा मानवविरहित यंत्रणांच्या माध्यमातून खणण्यात आला आहे. या बोगद्यासाठी जागा निवडताना हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काही तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. या बोगद्याच्या वरच्या बाजूला एक जिवंत विहीर आहे. या विहिरीमध्ये बारमाही पाणी असते. बोगदा खणल्यानंतरही वरची विहीर तशीच आहे. त्यामुळे या विहिरीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयआयटी तज्ज्ञांकडूनही या विहिरीतील नैसर्गिक जलस्त्रोताची दखल का घेण्यात आली नाही? असा प्रश्न निर्माण झाला असून, याच विहिरीचे पाणी कशेडी बोगद्यात पाझरत नसेल का? असा सवाल आता स्थानिक लोकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT