खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा पुन्हा एकदा बंद होऊन कोकण मार्गावरील वाहनचालकांच्या नशिबावर पाणी फेरले आहे. बोगद्यातील व मार्गावरील काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शनिवारी रोजी मध्यरात्री पासून हा निर्णय घेण्यात आला असला तरी, पर्यायी कशेडी घाटातील रस्त्यांची दयनीय अवस्था असल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.
बोगदा बंद झाल्याने वाहनचालकांना आता पुन्हा एकदा कशेडी घाटातील खड्ड्यांवरून, धुळीच्या ढगातून मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे त्यांच्या वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाहनचालकांची गैरसोय कमी करण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
कशेडी बोगदा व मुंबई - गोवा राष्ट्रीय मार्ग हा गेल्या दोन वर्षांत चर्चेचा व राजकारणाचा विषय बनला आहे. या मार्गाच्या रखडलेल्या कामा वरून कोकणच्या लोक प्रतिनिधींनी रान उठवणे अपेक्षित असताना अनेक जण सरकारी काम व बारा वर्षे थांब या भूमिकेची पाठ राखण करताना दिसत आहेत. त्यातच आता पुन्हा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने शनिवारी दि.२३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पासून पंधरा दिवस रस्ता बंद राहणार आहे असे वाहन चालकांना सांगत कशेडी बोगदा मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.
बोगद्यात अपूर्ण कामे पूर्ण करणे, चार पदरी रस्त्यावरील अर्धवट पुल बांधणे यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे,असे सांगितले जात आहे. मात्र हा निर्णय घेताना पर्यायी कशेडी घाट रस्त्याची अवस्था मात्र सुस्थितीत ठेवणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे लहान मोठे अपघात रस्त्यावरील खड्डे घडवत आहेत. वाहतुकीचा वेग देखील घाटात कमी असून हा त्रास नक्की कधी संपणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.