कणकवली बाजारपेठेत वृद्धावर मोकाट बैलाचा हल्ला 
रत्नागिरी

Sindhudurg News : कणकवली बाजारपेठेत वृद्धावर मोकाट बैलाचा हल्ला

भाजीचा गाडाही पलटी केला; प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : शहरातील महापुरुष मंदिरानजीक बाजारपेठेत शुक्रवारी सायंकाळी मोकाट बैलाने एका वृद्ध भाजीविक्रेत्यावर हल्ला केल्याची घटना घडली. बैल भाजीच्या गाड्यावरील भाज्या खात असल्याने वृद्धाने दांड्याच्या साहाय्याने त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला; मात्र याचवेळी बैलाने वृद्धाच्या अंगावर धाव घेतली आणि भाजीचा गाडाही रस्त्यावर पलटी केला. वृद्धाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. या घटनेत त्यांच्या भाजीचे व गाड्याचे नुकसान झाले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील एका व्यावसायिकाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शहरात मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नगरपंचायतीने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

कणकवली शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरांचा मुक्त संचार सुरू असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. शुक्रवारी सायंकाळी महापुरुष मंदिरानजीक भाजीविक्रीचा गाडा लावलेल्या वृद्धाच्या गाड्यावरील भाज्या मोकाट बैल खात होता. हे पाहून वृद्धाने दांड्याने बैलाला हाकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी बैलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हा बैल एवढ्यावरच न थांबता त्याने भाजीचा गाडाही रस्त्यावर पलटी केला. वृद्धाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला मात्र त्यांच्या भाजीपाल्याचे व गाड्याचे नुकसान झाले.

मोकाट गुरांचा बंदोबस्त कधी?

यापूर्वीही याच परिसरात या काळ्या मोकाट बैलाने वाहनांवर आणि नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. यात वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच काही व्यक्तींना दुखापतही झाली होती. आता भाजीविक्रेत्या वृद्धावर झालेल्या हल्ल्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्हीतील दृश्ये व्हायरल झाल्यानंतर मोकाट गुरांच्या उपद्रवाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः अंधारात रस्त्यावर बसलेली गुरे न दिसल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट गुरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी नागरिकांकडून होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT