गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणातील पाणीसाठा हा जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत गेली 35 ते 40 वर्षे जि. प. नळ पाणी पुरवठा (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) जि. प. उप अभियंता कार्यालय, रत्नागिरी यांच्यामार्फत चालविली जाते. गाळाच्या समस्येने हे धरण ग्रासले आहे.
या योजनेचा लाभ जयगड, लावगण, कासारी, चाफेरी, वाटद खंडाळा, सैतवडे, गुंबद, जांभारी, कोळीसरे, गडनरळ, कळझोंडी परिसरात 27 गावांना केला जातो. गेली कित्येक वर्षे या धरणातील गाळ काढला जात नाही. तसेच झाडे झुडपे ही तोडली जात नाही. एकूण 27 गावांना या धरणातून पाणीपुरवठा होत असताना पाणी शुद्ध करण्यासाठी जी पावडर टाकली जाते ती टी. सी. एल. पावडर टाकली जात नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच वाटप करताना धरणाची उंची वाढवली, धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. नवीन पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे.
नवीन पंप ही बसविण्यात आले आहेत. परंतु नवीन टाकीतील अस्वच्छ पाणी बाहेर काढून नव्याने नवीन पंप चालू करून नवीन पाईप लाईनने लवकरच पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. कळझोंडी धरणाची उंची वाढवल्यामुळे या धरणात पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, धरणातील झाडे झुडपे कुजून पाणीपुरवठा दूषित होऊ शकत नाही का, याबाबत लक्ष घालण्यात यावे, अशी वारंवार मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली आहे. पाण्याच्या साठवण टाक्यात जलशुद्धीकरण पावडर टाकण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.