गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी ग्रामपंचायतीची ग्राम सभा सरपंच दिप्ती दीपक वीर यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत समितीच्या सभागृहात झाली.यावेळी वाटद खंडाळा येथे येऊ घातलेल्या एम.आय.डी.सी.प्रकल्पाला या ग्राम सभेत उपस्थित 90% ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला.
जिंदाल कंपनीचे या भागात फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर वाटद एमआयडीसी प्रकल्पा बाबत संबंधीत वरिष्ठ अधिकारी व पर्यावरण तज्ज्ञ यांनी कळझोंडी गावातील लोकांच्या शंका, नोकरी धंदा गावावासियांना देण्यात येणार्या सोयी-सुविधा याबाबत माहिती प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालय कळझोंडी येथे उपस्थित राहून द्यावी, असा एकमुखी ठराव करण्यात आला आहे. तसेच या ग्रामसभेत 11 ऑगस्ट 2025 रोजी एका स्थानिक दैनिकात पक्ष व जातीभेद विसरून सर्वांनी पुढे या, प्रकल्पांचे अगणित फायदे घ्या! आणि सुबत्तेचे सर्वांनी वाटेकरी व्हा! सरपंच दिप्ती वीर यांचे आवाहन, अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. परंतु ती बातमी आपण दिली नाही किंवा त्या बातमीत प्रसिद्ध झालेला फोटो देखील माझा नसून त्या बातमीशी माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचा स्पष्ट खुलासा कळझोंडीच्या सरपंच दिप्ती वीर यांनी केला. त्यामुळे दिशाभूल आणि खोटी बातमी देणार्या व्यक्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थानी ग्रामसभेत केली आहे.
या विशेष ग्रामसभेत प्रस्तावित वाटद एमआयडीसीबाबतचा विषय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळताच सभेत गदारोळ होण्याची आणि मोठा वाद विकोपाला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन जयगड पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक विलास दीडपिसे व त्यांच्या पथकाने उपस्थित ग्रामस्थाना योग्य ते मार्गदर्शन करून चोख बंदोबस्त ठेवला होता. या सभेला उपसरपंच प्रकाश पवार, ग्रामविकास अधिकारी अमोल केदारी, सदस्य सहदेव वीर, सुर्यकांत बंडबे, उदय अगोंडे, सदस्या अंजनी शिंदे, वेदिका निंबरे, रिना रवीद्र वीर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पवार, सदस्य -किशोर पवार, सामाजिक कार्यकर्ते सहदेव वीर, शांताराम वीर, प्रदीप वीर, आनंद मुळ्ये, चित्तरंजन मुळ्ये,विनायक शिंदे, दीपक शिंदे आदी मान्यवर ग्रामस्थ गावातील 226 ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होत्या. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या परिपत्रके वाचन करून विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. अर्जांचे वाचन करण्यात आले.