रत्नागिरी

रत्नागिरी : ‘काजू बी’ ला अवघा १२६ रु. दर!

दिनेश चोरगे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील भागात काजू हंगामाला सुरुवात झाली असून, जिल्ह्याच्या काही भागांत काजू बी परिपक्व होऊ लागली आहे. दरम्यान, बागायतदार शेतकर्‍यांना काजू बी प्रतिकिलो 200 रु. दराची अपेक्षा असताना, केवळ १२६ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे बागायतदार शेतकर्‍यांतून नाराजीचा सूर उमटत असून, पुन्हा एकदा काजू बीच्या हमीभावाची निश्चित करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात लांबलेल्या पावसामुळे या वर्षी काजूला पालवी आणि मोहोर विलंबाने आला. त्या नंतर हवामान बदलाचा मोठा परिणाम काजू पिकावर झाला आहे. जिल्ह्यात दोन-तीन टप्प्यांत काजूला मोहोर आल्यामुळे काजू हंगाम तीन टप्प्यांत विभागणार, हेही स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहोराची काजू बी परिपक्व होण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यांच्या इतर भागांच्या तुलनेत काजू बी लवकर परिपक्व होते. येथील वातावरण काजू पिकाला अधिक पोषक मानले जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. विशेष करून वेंगुर्ले येथे काजू बी परिपक्व होऊ लागली आहे. त्या तुलनेत इतर तालुक्यात एखादा अपवाद वगळता काजू बी परिपक्व होण्यास अजूनही आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काजू बीला बाजारपेठेत अवघा प्रतिकिलो 126 रुपये दर मिळाला. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर असून, काजूबीला हमीभाव मिळणार तरी कधी, असा संतप्त सवाल उत्पादक शेतकर्‍यांतून विचारला जात आहे.

SCROLL FOR NEXT