काजिर्डा घाटमार्गाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात 
रत्नागिरी

Kajirda Ghat Survey : काजिर्डा घाटमार्गाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

डीपीआर लवकरच शासनाकडे सादर होणार; कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणारा घाट

पुढारी वृत्तसेवा

शरद पळसुलेदेसाई

राजापूर ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा आणखी एक लगतचा घाटमार्ग ठरणाऱ्या काजिर्डा घाट मार्गाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर त्याचा डीपीआर (डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट) शासनाला सादर केला जाणार आहे. या नवीन घाट मार्गामुळे प्रवासाचे अंतर आणि लागणारा वेळ कमी होणार असून, समस्त प्रवाशांसाठी नवीन घाट मार्ग फायदेशीर ठरणार आहे.

काही वर्षांपूर्वी नियोजित घाट मार्गाच्या सर्वेक्षणासाठी शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार मागील काही दिवसांत घाट मार्गाचे सर्वेक्षण सुरू असून ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचे सर्वेक्षण अल्मोटस या नाशिक स्थित कंपनीकडे देण्यात आले असून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे आठ किमीचा घाट मार्गाचे सर्वेक्षणाचे काम आहे. हा घाट मार्ग गावाबाहेरून काढला जाणार आहे. कारण काजिर्डा गावातील होत असलेल्या जामदा प्रकल्पामुळे घाट मार्ग बाहेरून घ्यावा लागत आहे. काजिर्डा घाट मार्गामुळे राजापूर तालुका आणि कोल्हापूर जिल्हा यामधील अंतर आणि वेळ कमी होऊन प्रवाशांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.

दोन वर्षापूर्वी कोकणात झालेल्या अतिवृष्टीत कोकण कोल्हापूर जोडणाऱ्या अनेक घाटात मोठ्याप्रमाणावर पडझड झाली होती आंबा घाट देखील त्यातून सुटला नव्हता त्यावेळी केवळ अणुस्कुरा घाट मार्ग द्वारे कोल्हापूर आणि पश्चित महाराष्ट्रकडे जाणारी वाहतूक सुरू होती. सर्व प्रकारची वाहतूक अणुस्कुरा मार्गे रात्रंदिवस सुरू राहिल्याने त्या घाटात देखील खड्डे पडले होते. त्यामुळे अणुस्कुरा घाट सुद्धा असुरक्षित होतो की काय अशी चिन्हे दिसत होती. अशावेळी कोकण कोल्हापूरला जोडणाऱ्या आणखी एका सुरक्षित व तेवढाच भक्कम घाटरस्त्याची गरज जाणवू लागली आणि अडगळीत पडलेल्या काजिर्डा घाटमार्ग एकदम उजेडात आला. कोल्हापूर कोकणला जोडणारा भक्कम व सुरक्षित म्हणून काजिर्डा घाटाकडे पाहिले गेले आणि काजिर्डाची दुसरी इनिंग सुरू झाली.

काजिर्डा घाट खोदकाम प्रकरणी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी लक्ष घातले आणि तो प्रश्न शासन दरबारी लावून धरला होता त्या मुद्द्यावरून सातत्याने पाठपुरावा केला. काजिर्डा घाटमार्ग कसा उपयुक्त आहे ते पटवून दिले. अखेर त्या प्रश्नी शासनाने सकारात्मकता दर्शवली आणि त्यावेळी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात प्रथमच काजिर्डा घाटाच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याचे तालुक्यातून जोरदार स्वागत झाले होते. काजिर्डा घाट रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात एक कोटीची तरतूद झाल्यानंतर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचे पुढील नियोजन करण्यात आले. नाशिक मधील अल्मोट्स या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले असून मागील काही दिवसांपासून सुरु असलेले काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ते पूर्ण होईलआणि त्याचा डीपीआर शासनाला सादर केला जाईल.

काजिर्डा घाटामुळे राजापूर तालुक्यातून कोल्हापूरकडे जाणारा आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर यामुळे प्रवाशांना प्रवास करताना खूप आनंद घेता येईल. घाट मार्गाचे सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. भविष्यात चांगला आणि दर्जेदार घाट उपलब्ध होईल. समस्त तालुका वासीयांसह पावसाळी दिवसांत कोकणात येणाऱ्या कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र मधील पर्यटकांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. घाटाच्या बाजूलाच बारमाही वाहणारा धबधबा असून, पावसाळ्यात तसेच त्यानंतर देखील पर्यटक काजिर्डा गावी भेट देतात. घाट मार्ग सुरू झाल्यावर पर्यटकांना त्या धबधब्याकडे जाण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT