चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांच्या सोबत 35 वर्षे काम केले. नेहमी संपर्कात असतानाही त्यांनी हकालपट्टी करण्याआधी एकदाही चर्चा केली नाही. तालुकाप्रमुखाची नेमणूक वृत्तपत्रातून समजली आणि पक्षातून हकालपट्टी झाल्याची माहितीदेखील वृत्तपत्रातून समजली. मुळात हकालपट्टीचे अधिकार नेमके कोणाला? पालकमंत्र्यांना भेटलो म्हणून हकालपट्टी झाली का? असा सवाल उद्धव सेनेचे माजी तालुकाप्रमुख जितेंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
वारंवार पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव सेनेचे तालुकाप्रमुख चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केली जात असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केले होते. चव्हाण यांच्या नेमणुकीपासून गुहागर मतदारसंघात समावेश असलेल्या चिपळूणमधील 72 गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी होती. त्यांच्याकडून वारंवार विरोध होत होता. त्यातून पक्षाने ही कारवाई केली असल्याचे आमदार जाधव यांनी स्पष्ट केले होते.
यावर चव्हाण म्हणाले, तालुकाप्रमुख पदाची मी कधीही मागणी केली नव्हती. नेमणुकीवेळी कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नव्हते, अथवा त्यांच्याशी चर्चा केली नव्हती. पक्षात अनेक वर्षे काम करताना कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. उलट पक्षानेच या पदावर नेमणूक केली. त्याप्रमाणे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. या पदावर काम करताना 72 गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीदेखील तितकेच सहकार्य केले. आपले सर्वच पक्षांशी चांगले संबंध आहेत. कामासाठी आपण कोणाची भेट घेऊ शकत नाही का? काही ठराविक पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात कटकारस्थान सुरू ठेवले होते. त्यावर पक्षनेतृत्वाने चर्चेतून मार्ग काढायला हवा होता. मात्र तसे न करता थेट हकालपट्टीची कारवाई केली गेली. या कारवाईचे साधे पत्रदेखील आपल्याला मिळालेले नाही. त्यामुळे नेमकी कोणी कारवाई केली व अधिकार कोणाला याबाबत शंका असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी चव्हाण यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्या ऋतुजा चव्हाण उपस्थित होत्या.