जांभरुण गावातील शेकडो वर्षांपूर्वीचे पारंपरिक पाट. (Pudhari File Photo)
रत्नागिरी

Konkan Heritage Village | कोकणातील अनोखे गाव, येथे घरोघरी 24 तास वाहतात डोंगरातील पाण्याचे झरे

Sahyadri foothills villages | मध्ययुगात 400 वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कुशीत वसलेले जांभरुण गाव

पुढारी वृत्तसेवा

जान्हवी पाटील

रत्नागिरी : जांभरुणमधील मंदिरे किती देखणी, 500 वर्षांपूर्वीची खासगी मंदिरे, निसर्गाची किमयाच न्यारी..! निसर्ग कुठे चमत्कार करेल हे सांगता यायचे नाही. असाच चमत्कार झालाय कोकणातील जांभरुण नावाच्या छोट्याशा गावात. सह्याद्रीच्या पर्वतराजीने वेढलेल्या या गावातील घराघरांत डोंगरातील नितळ, स्वच्छ अन् स्फटिकासारखे पाणी खळाळून वाहते. डोंगरातील या पाटाच्या पाण्याने या गावातील अनेक पिढ्या पोसल्या आहेत. आश्चर्य म्हणजे, हे पाणी 24 तास खळाळत असते.

रत्नागिरी जिल्ह्यातील जांभरुण हे एक सुंदर आणि शांत गाव आहे. हे गाव डोंगरांनी वेढलेले असून, येथील घरांची रचना जांभ्या दगडांनी केली आहे. येथील लोक अजूनही डोंगरातील नैसर्गिकरीत्या खळाळणार्‍या पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि दैनंदिन कामांसाठी करतात. जिवंत झर्‍याचे पाणी खाली पाटांद्वारे वळवण्यात आले आहे आणि त्याच पाटांवर घरे बांधून अक्षरश: चारशे वर्षांपासून लोक इथे राहत आहेत.

रत्नागिरीतील जांभरुण या नावाने ओळखले जाणारे हे गाव... या गावाला चहुबाजूंनी डोंगरांनी मिठीत घेतलेय, या डोेंगरांतून खळखळ आवाज करत डोंगराचे पाणी घेऊन एक बारमाही नदी वाहते. याच डोंगर उतारावर भाताची खाचरे, माड, फणस, आंबा, सुपारीच्या झाडांची गर्दी दिसते; मग या झाडांच्या गर्दीतून पाझरणारी मधुर वाणी, टुमदार कोकणी घरे आणि आपुलकीने भरलेली येथील माणसे, असे ओसंडून वाहणारे निसर्गसौंदर्य या गावाला लाभले आहे.

या गावात आजही 24 तास डोंगराचे झर्‍याचे पाणी पाटाने वाहते. गावची लोकसंख्या सुमारे 1 हजार आहे. गावातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा भातशेती, नारळी-पोफळी या पिकांवर चालतो. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, गावात 400 ते 500 वर्षे जुनी खासगी मालकीची मंदिरे अजूनही शाबूत आहेत. ही मंदिरे-घरे यांना दगडी पायवाटेने जोडलेले आहे. त्यांना या ठिकाणी पाखाड्या म्हटले जाते. अशा कितीतरी पाखाड्या, विशाल स्थानिक झाडे, मंदिरे असा नैसर्गिक सांस्कृतिक वारसा लाभलेले निसर्गसमृद्ध असे हे गाव आहे. हे गाव सुमारे 400 वर्षे जुने आहे. या गावाजवळ येताच निसर्गाचे सौंदर्य बघून पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहोचते.

सस्टेनेबल डेव्हलपमेंट नक्की काय असते ते या गावात गेल्यावर कळते. एकूण 21 लेव्हलने 21 पाट जांभरुण या गावात बांधण्यात आलेले आहेत. हे पाट आताचे नाहीत, तर 250 वर्षांपूर्वीचे आहेत, या पाण्याचे नियोजन पूर्वजांनी त्याचवेळी केले होते यावरून लक्षात येते. एकीकडे निसर्गरम्य वनराई नष्ट करून सिमेंटचे जंगले तयार होत असताना, दुसरीकडे आजही कोकणातील गावांमध्ये 400 वर्षांपूर्वीची परंपरा जतन केली जात आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वी जांभरुण गावातील काही वाड्यांमध्ये नळपाणी योजना नव्हती. त्यावेळी याच पाटांच्या पाण्याचा वापर घरोघरी करण्यात आला. पाटांचे उगमस्थान कातळातून झाले आहे. आता नळपाणी योजना गावात असली, तरी आजही पाटाचे पाणी स्वच्छ आहे. आमचे गाव पाटांचे पाणी आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे सगळीकडे सुपरिचित झाले आहे.
मंदार थेराडे, उपसरपंच, जांभरुण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT