जगबुडी नदी इशारा पातळीवर 
रत्नागिरी

Ratnagiri Flood Alert : जगबुडी नदी इशारा पातळीवर

धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

खेड : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने सोमवारी दुपारी पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली. सायंकाळी ४ वाजता भरणे नाका पुलाजवळ जगबुडी नदीची पाणी पातळी ५.२० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, इशारा पातळी ५ मीटर आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. नातुवाडी मध्यम प्रकल्पात ८७.६९ मीटर पाणी पातळी नोंदली गेली असून, उपयुक्त पाणीसाठा ११८.३७७ दलघमी (६७.४९ टक्के) झाला आहे. या प्रकल्पातून ५.११९ घनमीटर प्रति सेकंद वेगाने सांडवा विसर्ग सुरू आहे. पिंपळवाडी लघु प्रकल्पात १२५.९१ मीटर पाणीपातळी, १७.९४८ दलघमी (६७.३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. या धरणातून २८.४० घनमीटर प्रति सेकंद सांडवा विसर्ग तसेच १.७९ घनमीटर प्रति सेकंद विमोचक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, शिरवली लघु प्रकल्प शंभर टक्के भरला असून, त्यातील उपयुक्त पाणीसाठा २.९७८ दलघमी आहे. या धरणातून २.९६६ घनमीटर प्रति सेकंद सांडवा विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सतत पडणार्‍या पावसामुळे जगबुडी, नारिंगी तसेच त्यांच्या उपनद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT