रत्नागिरी जिल्हा परिषद  (Pudhari Photo)
रत्नागिरी

Ratnagiri ZP News | इस्रो-नासा दौरा विद्यार्थी की अधिकार्‍यांसाठी?; पालकमंत्र्यांनी रत्नागिरी जि.प.मधील अधिकार्‍यांची घेतली ’शाळा‘

मागील तीन वर्ष जे अधिकारी गेले होते, तेच पुन्हा यावर्षीही गेल्याने उलटसुलट चर्चा

पुढारी वृत्तसेवा
दीपक कुवळेकर

Ratnagiri ZP ISRO NASA Tour Controversy

रत्नागिरी : जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना इस्रो व नासासाठी नेण्यात आलेला अभ्यास दौरा वादात सापडला आहे. या दौर्‍यात अधिकार्‍यांचा भरणा जास्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांत तेच तेच अधिकारी या दौर्‍यात दिसून येतात. त्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा गंभीर दखल घेतली आहे. एकंदरित हा अभ्यास दौरा अधिकार्‍यांसाठी की विद्यार्थ्यांसाठी असा सवाल उपस्थित होत आहे.

अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी नासा (अमेरिका) व इस्रो (भारत) येथे शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना नेण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी घेण्यात आला. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न करत जिल्हा नियोजनमधून निधीचीही तरतूद केली. खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्ता वाढीचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु काही उपक्रमांना वादाचा किनारा लागत आहे.

या वर्षी चाळणी परीक्षेतून इस्रो व नासासाठी अंतिम मुलांची निवड करण्यात आली. या मुलांना तीन महिन्यापूर्वी इस्रोसाठी नेण्यात आले. गेल्या तीन वर्षाचा हा दौरा नेहमी वादळात सापडत आहे. मुळात ज्यांचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध नाही, अशा अधिकार्‍यांना या दौर्‍यात नेण्यात येत आहे. गतवर्षीसुद्धा नासा व इस्रोसाठी अधिकार्‍यांचाच जास्त भरणा दिसून आला होता. यावर्षीसुद्धा हेच चित्र असल्याने हा अभ्यास दौरा नेमका कुणासाठी? विद्यार्थ्यांसाठी की अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेली तीन वर्ष जे अधिकारी गेले होते तेच पुन्हा यावर्षीही गेल्याने सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

मुळात निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना नेणे अपेक्षित असताना नको त्या कर्मचारी व अधिकार्‍यांना का नेण्यात येते? हे एकप्रकारे गौडबंगालच आहे. या दौर्‍यावर लाखो रुपयांचा खर्च टाकला जातो. या अधिकार्‍यांना नेण्यापेक्षा त्या खर्चात अजून काही विद्यार्थ्यांना नेण्यात यावे, अशी मागणी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. काही दिवसापूर्वी जि.प.भवनात शिक्षण विभागाचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी या विषयावर अधिकार्‍यांची चांगलीच ’शाळा‘ घेतली होती. तेच तेच अधिकारी कसे जातात आणि ज्यांचा संबंध नाही त्यांचा का समावेश करतात. याबाबत अधिकार्‍यांना धारेवर धरले. उपस्थित अधिकार्‍यांनी थातुरमातूर उत्तर देत वेळ निभावून नेली.

एका अधिकार्‍याचा हट्ट चर्चेत!

गतवर्षी इस्रो व नासासाठी गेलेला दौराही वादात सापडला होता. या दौर्‍यातही अधिकार्‍यांचाच अधिक भरणा होता. त्याचबरोबर खर्चाचाही ताळमेळ लागत नसल्याची चर्चा सुरू आहे. नेण्यासाठी वाहतुकीसाठी जी व्यवस्था करण्यात आली तिचा ठेका परजिल्ह्यातील एका संस्थेला देण्यात आला होता. एका अधिकार्‍याच्या हट्टापायी हा ठेका त्या संस्थेला देण्यात आला होता. यावरूनही उलटसुलट चर्चा सुरू होती.

सिंगापूर वारीची चर्चा...

अमेरिकेला जाण्यासाठी विद्यार्थी तसेच अधिकार्‍यांची व्हिसासाठी गेल्या आठवड्यात मुलाखती झाल्या. यामध्ये 7 विद्यार्थी, 2 अधिकारी असे एकूण 9 जणांचा व्हिसा नाकारल्याची चर्चा सुरु आहे. पैसे फुकट जाऊ नये म्हणून एका अधिकार्‍यांने सिंगापूर वारीची योजना आखली आहे. तसा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवल्याचे चर्चा बुधवारी जिल्हा परिषद भवनात सुरु होती. यामुळे सिंगापूर वारीचीसुद्धा चर्चा सुरु झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT