मुंबई विद्यापीठाच्‍या युवा महोत्‍सवात उ‍त्कृष्ट सादरीकरण करूनही स्थान न मिळाल्याने नाराजी; 
रत्नागिरी

Ratnagiri News : विद्यापीठ युवा महोत्सवात ग्रामीण महाविद्यालयांवर अन्याय?

मुंबई विद्यापीठाच्‍या युवा महोत्‍सवात उ‍त्कृष्ट सादरीकरण करूनही स्थान न मिळाल्याने नाराजी; कोकण विभागासाठी लांजा महाविद्यालयात आयोजन

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाचे आयोजन साऊथ कोकण विभागासाठी लांजा येथील महाविद्यालयात करण्यात आले. या महोत्सवात संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मात्र उत्कृष्ट सादरीकरण करूनही अनेक ग्रामीण भागातील महाविद्यालयांना क्रमांक न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

युवा महोत्सव हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणारा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. या स्पर्धांसाठी महाविद्यालये अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतात. मात्र, यंदाच्या महोत्सवात अनेक उत्कृष्ट सादरीकरणांनाही न्याय मिळाला नसल्याची भावना सहभागी महाविद्यालयांनी व्यक्त केली आहे.

काही स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय क्रमांकच जाहीर करण्यात आला नसल्याची चर्चा असून त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. मेहनत करूनही योग्य मूल्यमापन होत नसल्याची भावना विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण असूनही त्यांना अपेक्षित संधी मिळत नसल्याचा आरोप काही महाविद्यालयांच्या प्रतिनिधींनी केला आहे. शहरातील महाविद्यालयांना जाणीवपूर्वक प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे. यामुळे पुढील वर्षी युवा महोत्सवात सहभागी व्हायचे की नाही, असा प्रश्न काही महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे.

काही प्राचार्यांनी या संपूर्ण प्रक्रियेबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. स्पर्धांचे मूल्यमापन अधिक पारदर्शक व्हावे, सर्व सहभागी महाविद्यालयांना समान न्याय मिळावा आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य संधी मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागातील वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का? आणि स्पर्धांच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत आवश्यक पावले उचलणार का, याकडे सहभागी महाविद्यालये व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT