दापोली : दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णे बंदरात गेल्या काही दिवसांत बला (बगा) माशांची आवक वाढत आहे. वादळामुळे काही काळ मच्छीमारी बंद होती; मात्र हवामान स्थिर झाल्यानंतर बोटी पुन्हा समुद्रात गेल्या असून मच्छीमारांना जाळ्यात बला मासे मिळत आहेत.याउलट, कोळंबीची आवक घटली असून बाजारात तिच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्तहोत जात आहे.
वादळाच्या काळात पर्यटनावरही परिणाम झाला होता. आता समुद्र शांत आणि वातावरण खुलल्याने हर्णे बंदर परिसरात पुन्हा एकदा पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मासळी लिलावात अनेक पर्यटक उत्सुकतेने सहभागी होताना दिसत आहेत. मच्छीमार बांधवांचे म्हणणे आहे की, समुद्र आता मासेमारीसाठी अनुकूल झाला असून पुढील काही दिवसांत बल्यासह इतर जातींच्या माशांची आवकही वाढेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हर्णे बंदर परिसर पुन्हा उत्साहाने गजबजला आहे.