चिपळूण शहर : जिल्ह्याचा पालकमंत्री व राज्याचा मंत्री म्हणून माझी सुरुवात झालेल्या राजकीय कारकिर्दीच्या यशामध्ये चिपळूणचा वाटा सर्वात मोठा आहे. 2013 रोजी चिपळुणात झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनामध्ये तत्कालीन आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांनी मला पालकमंत्री व मंत्री करणार असल्याचे सांगून सुखद धक्का दिला. मात्र, यामागे सर्व श्रेय चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांना आहे, असे मनोगत पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (दि. 11) चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात माजी आ. रमेश कदम यांच्या सन्मान सोहळ्यात व्यक्त केले. त्यापूर्वी ना. सामंत यांच्या हस्ते लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन झाले.
रविवारी चिपळुणातील शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करणार्या वाचनालयाने महापुरानंतर उभारी घेतलेल्या दुर्मीळ वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन पालकमंत्री ना. उदय सामंत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या वस्तू संग्रहालयाला रामभाऊ साठे यांचे नाव देण्यात आले आहे. हा कार्यक्रम लोटिस्मामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर वाचनालयाच्यावतीने माजी आ. रमेश कदम यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाचनालयाचे सन्माननीय सदस्य म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांचा ना. सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना माजी आ. कदम यांनी सांगितले की, ज्या संस्थेत प्रामाणिकपणे काम करण्याची तळमळ व इच्छा असते अशा संस्थांची भविष्यात उत्तरोत्तर ऊर्जितावस्था होत असते. वाचनालय आज दीडशे वर्षांचा टप्पा ओलांडण्याच्या वाटेवर आहे. वाचनालयाने केवळ वाचन संस्कृती न ठेवता चिपळूणच्या सांस्कृतीक, सामाजिक क्षेत्रात व्यापक काम सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात वाचनालयाचा उत्कर्ष लक्षात घेता पूर्वीप्रमाणेच यापुढेही माझे सर्व सहकार्य राहील. त्याचबरोबर चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नगर परिषदेच्या हद्दीतील मालकीची आरक्षित एकरभर जागा तांत्रिक व नियमांच्या निकषात बसवून वाचनालयाला उपलब्ध करून द्यावी व या जागेवर एकाच छताखाली वाचनालयाचा वटवृक्ष बहरावा. यासाठी आवश्यक असणारा शासकीय निधी व सर्व मदत निश्चितच पालकमंत्री ना. सामंत व चिपळूणचे कार्यतत्पर आमदार शेखर निकम करतील अशी ग्वाही कदम यांनी दिली.
यावेळी ना. उदय सामंत यांनी वाचनालयाच्या ऋणानुबंधासह आपल्या राजकीय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेताना चिपळुणातील गाजलेल्या साहित्य संमेलनामुळेच आपण आज राज्याचा मंत्री व पालकमंत्री झालो आहे. त्यावेळी संमेलनाला नेते शरद पवार यांच्यासोबत सिंधुुदुर्ग जिल्ह्यातून हेलिकॉप्टरने आपण चिपळूणकडे येत होतो. त्यावेळी पवार साहेबांनी मला शेजारी बसवून चिपळूणच्या प्रवासादरम्यान, ‘तुला मी पंधरा दिवसांतच मंत्री करणार आहे’ असे सांगून सुखद धक्का दिला. मात्र, या सर्व राजकीय यशामागे चिपळूणचे माजी आ. रमेश कदम यांचा फार मोठा वाटा आहे. ज्यावेळी माझी राजकीय कारकिर्द सुरू झाली त्यावेळेस ते पक्षाचे नेते होते. त्यांच्या शब्दाचे वजन जिल्हाभरात होते. अनेकवेळा मी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असे. मात्र, शेवटपर्यंत मला त्यांच्या मनात काय चालले आहे हे अद्यापही कळले नाही. त्यांच्या या स्वभावाची तुलना पवार साहेबांच्या स्वभावाशीच करावीशी वाटते. आजच्या घडीला मी राजकीय प्रवाहानुसार बदललो आहे. आज मी मंत्री आहे. मात्र, ज्या भाईंमुळे मी मंत्री झालो ते मात्र आज मंत्री नाहीत. यामागे त्यांचा निःस्वार्थीपणा दिसून येत आहे.
राजकारणात राहून संघर्ष आणि निःस्वार्थीपणा जपणारे उदाहरण म्हणजे भाई आहेत. चिपळूणवासीयांनी 2021 चा महापूर अनुभवला आहे. त्याचा मी साक्षीदारही आहे. त्यावेळी मी वाचनालयाला भेट दिली असता झालेली दुरवस्था पाहून व श्री. देशपांडे यांनी मदतीची अपेक्षा करताच तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तातडीने मंजूर केलेल्या रक्कमेतून 50 लाख रूपये वाचनालयाच्या उभारणीसाठी द्या, असे सांगितले. त्यामुळे राजकारणात पडद्यामागील व्यक्तींनीही वाचनालयासाठी मोठी मदत केली आहे.
चिपळूण शहराच्या विकासासाठी मी नेहमीच तत्पर असेन. माजी आ. रमेश कदम यांच्यासह आमदार शेखर निकम यांनी कोणतेही प्रकल्पाचे प्रस्ताव द्यावेत. शासनाकडून आवश्यक असणारा निधी मी उपलब्ध करून शहराच्या विकासाची ग्वाही देतो. चिपळूण न.प. देखील शतकोत्तरी सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. त्यापूर्वीच न.प.ची भव्यदिव्य इमारत उभी राहाण्याकरिता मी शासनाकडून लागेल तो निधी देण्याचा शब्द देतो, असे ना. सामंत यांनी सांगितले. यावेळी आमदार शेखर निकम, लोटिस्मा वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, प्रकाश देशपांडे, धनंजय चितळे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, डॉ. श्रीधर ठाकूर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.