Inauguration of Nuclear Medicine Center at Derwan
डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील 'सेंटअर फॉर न्यूक्लियर मेडिसिन' चा शुभारंभ करताना टाटा मेमोरियलचे अधिष्ठाता डॉ. सुदीप गुप्ता. सोबत अशोक जोशी, विकास वालावलकर, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. श्रीपाद बाणावली, रमेश कदम, प्रशांत यादव आदी.  file photo
रत्नागिरी

'सेंटर फॉर न्यूक्लियर'मुळे ग्रामीण व्यक्तींचे जीवनमान सुधारेल : डॉ. सुदीप गुप्ता

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : कर्करोगाच्या प्रत्येक रुग्णांच्या घरानजीक उपचार केंद्र उपलब्ध करणे हे आमचे मुख्य उद्दीष्ट आणि ध्येय आहे. हेच ध्येय डेरवणमध्ये साकार करताना डॉ. श्रीपाद बाणावली हे वालावलकर व टाटा मेमोरीयल हॉस्पिटल यांना जोडणाऱ्या नाळेची भूमिका बजावत आहेत. यापुढे वालावलकर हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल हे नेहमी एकजुटीने हातात हात घालून पुढील वाटचाल करू. सेंटर फॉर न्यूक्लियर मेडिसिन सुविधेमुळे ग्रामीण व्यक्तींचे जीवनमान लक्षणीयरित्या सुधारेलच, असे प्रतिपादन टाटा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी केले.

चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात टाटा मेमोरिअल सेंटर, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आणि रमा पुरुषोत्तम फौंडेशन यांनी 'सेंटर फॉर न्यूक्लियर मेडिसिन' कार्यान्वित केले आहे. त्याचा शुभारंभ रविवारी १४ जुलै रोजी टाटा मेमोरियलचे अधिष्ठाता डॉ. सुदीप गुप्ता यांच्या हस्ते फित कापून झाले. या सेंटर फॉर न्यूक्लियर मेडिसिनची स्थापना स्वतंत्र इमारतीत केली आहे. या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख विश्वस्त अशोक जोशी, विकास वालावलकर, रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, टाटा मेमोरियलचे डॉ. श्रीपाद बाणावली, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, कोटक महिंद्रा बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

'कोकणात २८ वर्षांपासून टाटा मेमोरियल कार्यरत'

यावेळी डॉ. सुदीप गुप्ता म्हणाले की, अशोक जोशी (काका महाराज), श्री विकास वालावलकर, डॉ. श्रीपाद बाणावली या मंडळींचे आभार मानावे लागेल. खरं तर कोकणात १९९६ पासून म्हणजेच गेली २८ वर्षे टाटा मेमोरियल कार्यरत आहे. या मंडळींनी पेरलेली ही समर्पणाची बीजे आता कोकणाला फळ देत आहेत. त्यातून नवीन नुक्लिअर मेडिसिन केंद्रात पेट सिटी आणि स्पेक्ट स्कॅन सुविधा, रेडिओ आयोडीन थेरपी, या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ६५०० चौरस फूट परिसरात असलेल्या बहुमजली इमारतीमध्ये हे केंद्र स्थित आहे. एईआरबीने शिफारस केल्यानुसार भिंती, मजला आणि छताचे स्लॅब २३० एमएम जाडीचे आरसीसीमध्ये केले आहे. यात पेट आणि स्पेक्टसाठी एमटीआर खोल्या आणि ज्यात स्वतंत्र इलेक्ट्रिक रूम आहेत. प्रत्येक मशीनसाठी सुयोग्य हॉट लॅब, रेडिओफार्मसी, डोस ॲडमिनिस्ट्रेशन स्टेशन्स, वेटिंग एरिया आहेत. विभागात निर्माण होणारा किरणोत्सर्गी कचरा साठवण्यासाठी समर्पित किरणोत्सर्गी कचरा साठवण कक्ष तयार केले जातात. सुरक्षितता राखण्यासाठी स्वतंत्र किरणोत्सर्गी स्त्रोत, स्टोरेज रूम सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत.

'प्रत्येक व्यक्तीच्या दुःखाचे निवारण करणे आपले काम'

आपले काम तोवर संपणार नाही, जोवर आपण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील दुःखाचे निवारण करत नाही. तसेच आपल्या देशाचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातील विकसित राष्ट्र घडवण्यासाठी २०४७ म्हणजे येत्या २४ वर्षात आपल्याला प्रगती, उत्तम रोजगाराच्या संधी, मातामृत्यू दरात घट, अद्यावत आरोग्य सुविधांची उपलब्धता यावर विशेष भर दिला पाहिजे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. यानंतर टाटा संचालक डॉ. श्रीपाद बाणवली म्हणाले की, संपूर्ण कोकणातील रुग्णांना पेट सिटी स्कॅन कार्डियाक व्हायबिलिटी, रीनल, कार्डियाक, लिव्हर, बोन, थायरॉईड, जीआय रिफ्लक्स, फुफ्फुसाचे परफ्युजन स्कॅन, आयोडीन थेरपी या सुविधेचा लाभ होणार आहे.

SCROLL FOR NEXT