रत्नागिरी

रत्नागिरीत काजू, नारळ, सुपारी लागवड क्षेत्र वाढतेय

दिनेश चोरगे

[author title="भालचंद्र नाचणकर" image="http://"][/author]

रत्नागिरी : एकदा लागवड केल्यानंतर वर्षानुवर्षे उत्पन्न देणारी काजू, सुपारी, नारळाची लागवड जिल्ह्यात वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 10 हजार 620 हेक्टर क्षेत्राने ही लागवड वाढली आहे. जिल्ह्याच्या मंडणगड आणि दापोली तालुका वगळता इतर सात तालुक्यांमध्ये काजू, सुपारी, नारळ लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.

काजू, सुपारी आणि नारळ ही पिके वर्षाचे बाराही महिने वापरात असतात. काजू पीक खडकाळ आणि डोंगर उतारावर चांगल्या प्रमाणात येते. जांभ्या दगडापासून निर्माण झालेल्या तांबड्या जमिनीत हे पीक बहरत जाते. त्याचबरोबर सुपारी आणि नारळाची लागवड किनारपट्टीत चांगल्या प्रकारे होतेे. जिल्ह्यात ही पिके घेण्यासाठी चांगले वातावरण असल्याने लागवडीखालचे क्षेत्र वाढू लागले आहे. त्यात ही पिके चांगले उत्पन्न मिळवून देणारीसुद्धा ठरत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार दहा वर्षांपूर्वी म्हणजे सन 2011-12 मध्ये काजू, नारळ, सुपारी पिकाखालचे क्षेत्र 1 लाख 8 हजार 902 हेक्टर इतके होते ते आता सन 2022-23 मध्ये 1 लाख 19 हजार 522 हेक्टर इतके वाढले आहे. सुमारे 10 हजार 620 हेक्टर क्षेत्रामध्ये ही लागवड वाढली असली तरी मंडणगड तालुक्यात 11 हेक्टरने तर दापोलीत 78 हेक्टरने लागवड कमी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी मंडणगडात 8 हजार 635 हेक्टरमधील लागवड 8 हजार 624 हेक्टरपर्यंत कमी झाली. दापोली तालुक्यात 15 हजार 621 हेक्टरमध्ये ही लागवड होती ती कमी होऊन 15 हजार 543 हेक्टरपर्यंत आली.

खेड तालुक्यात 16 हजार 993 हेक्टरमधील लागवड आता 17 हजार 130 हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. चिपळुणातील ही लागवड 14 हजार 126 हेक्टरमध्ये होती ती आता 16 हजार एक हेक्टरपर्यंत वाढली आहे. गुहागरात 9 हजार 662 हेक्टरमध्ये लागवड होती आता हे लागवडीचे क्षेत्र 11 हजार 213 हेक्टपर्यंत पोहोचले आहे. रत्नागिरी तुलक्यातील 6 हजार 300 हेक्टरचे क्षेत्र वाढून 9 हजार 326 हेक्टर झाले आहे. संगमेश्वरात 15 हजार 401 हेक्टरचे क्षेत्र 16 हजार 75 हेक्टरपर्यंत वाढले आहे. लांजा तालुक्यातील 11 हजार 111 हेक्टरचे क्षेत्र 13 हजार 166 हेक्टपर्यंत पोहोचले आहे. राजापूर तालुक्यातील काजू, नारळ, सुपारीची लागवड दहा वर्षांपूर्वी ÷11 हजार 53 हेक्टरमध्ये होती ती आता 12 हजार 443 हेक्टरपर्यंत गेली आहे.

रत्नागिरी तालुका अग्रेसर

जिल्ह्याच्या रत्नागिरी तालुक्यात काजू, नारळ, सुपारीचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दहा वर्षांत तब्बल 3 हजार 26 हेक्टरने हे क्षेत्र वाढले असून, पाठोपाठ लांजा (2 हजार 55 हेक्टर) आणि चिपळूण तालुक्याचा (1 हजार 875 हेक्टर) समावेश आहे.

SCROLL FOR NEXT