आरवली : रत्नागिरी जिल्ह्यातील खाडी पात्रात सक्शन पंपाद्वारे होणार्या अवैध वाळू उत्खनाविरोधात जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले असताना मात्र करजुवे-माखजन विभागातून आता मध्य रात्रीपासून पहाटे अवजड वाहनातून वाळू वाहतूक होत असल्याच्या ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीची कोणी दखल घेण्यास तयार नसल्याने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना बेकायदा वाळू उत्खननावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. असे असताना करजुवे, धामापूर आणि माखजन भागातून मध्य रात्रीपासून पहाटेपर्यंत डंपर, टेम्पो आदी अवजड वाहनांतून वाळूची वाहतूक होत आहे. या वाहतुकीकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वाळूमाफियांना अप्रत्यक्ष आशीर्वाद देत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून वाहतूक करण्यात येत आहे. बेकायदा वाळू उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात बुडत असताना महसूल खात्याचे स्थानिक अधिकारी गप्प का, असा सवालही विचारला जात आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशापूर्वी राजरोस वाळू उपसा करण्यात येत होता. तसेच दिवसभर वाळू वाहतूक करण्यात येत असे, मात्र आता जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यावर वाळू माफियांनी आपले वेळापत्रक बदलून आता पहाटेचा वेळ निवडला आहे. अवजड वाहने आणि वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून वाहतूक करण्यात येत असल्याने माखजन आरवली मार्गांवरील वाहतूक धोकादायक बनली आहे. वाळूने भरलेले डंपर चालक रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अन्य छोट्या वाहनांना बाजू देत नसल्याने मोटारसायकल, जीप आदी छोट्या वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे.
वाळू वाहतूक करणार्या अवजड वाहनामुळे रस्त्याची परिस्थितीही धोकादायक बनत चालल्याने वहातुकीस अडथळे निर्माण होणार आहेत. पोलिस आणि संबंधित प्रशासनाने वेळीच कारवाई करावी, अशी मागणी जोड धरू लागली आहे.