पावस : गोळप येथे युवा शेतकरी रुपेश गार्डी यांनी केलेली भाजीपाला लागवड. 
रत्नागिरी

Vegetable farming on ten gunthas | दहा गुंठ्यांत भाजीपाला शेतीचा आदर्श

शहराकडे धावणाऱ्या तरुणांसमोर रुपेश गार्डी यांचा प्रयोग; गणेशोत्सवाच्या तोंडावर ताज्या भाज्यांना चांगला दर

पुढारी वृत्तसेवा

पावस : पुढारी वृत्तसेवा

तरुण पिढी नोकरीसाठी शहराकडे धाव घेत असताना गोळप येथील युवा शेतकरी रुपेश गार्डी यांनी दहा गुंठ्यात भाजीपाला लागवड करून आदर्श निर्माण केला आहे. वानर-माकडांच्या त्रासावर मात करत घेतलेले हे पीक गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांना चांगले उत्पन्न मिळवून देत आहे.

सध्या अनेक तरुण पारंपरिक जमीन पडीक ठेवून शहरात नोकरीसाठी जात असताना गोळप येथील रुपेश दत्तराम गार्डी या युवकाने आपल्या १० ते १२ गुंठ्यांच्या परसबागेत भाजीपाला लागवडीतून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या परसबागेमध्ये मांडव घालून या भाजीपाल्याची लागवड केली जात असे व त्यातून घराचा उदरनिर्वाह भागवला जायचा व आपल्या परसबागेतील हक्काची भाजी जेवणामध्ये मिळत होती. अशा तन्हेने सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवण्याची पद्धत होती, परंतु कालांतराने बाजारातून विकत भाजीपाला घेण्याची पद्धत सुरू झाली.

त्याच पारंपरिक पद्धतीचा अवलंब करून गेली दहा-बारा वर्ष लागवड करून एक व्यावसायिक रूप देण्यात आले आहे. त्यांनी आपल्या परिक्षेत्रात मांडव घालून विविध भाज्यांची लागवड केली आहे. रत्नागिरी-पावस सागरी मार्गावर आणि पावस व रत्नागिरी बाजारपेठेत दररोज सकाळी ताजा भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जातो.

ताजी भाजी मिळत असल्याने स्थानिक ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून दुपारपर्यंत सर्व भाजी विकली जाते. यात पडवळ, दोडका, काकडी, भेंडी, वाली, भोपळा, चिमूर आदी भाज्यांची त्यांनी लागवड केली आहे. जून महिन्यात लागवड केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा चांगला उपयोग झाला असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून उत्पादन सुरू झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या भाजीला चांगली मागणी आणि दर मिळत आहे.

याबाबत बोलताना रुपेश गार्डी म्हणाले, जूनमध्ये लागवड केल्यास पावसाच्या पाण्याचा फायदा होतो. परिसरात वानर-माकडांचा खूप त्रास आहे. त्यामुळे अनेक शेतकरी लागवड करत नाहीत. मात्र आम्ही दिवस-रात्र राखण करतो आणि विविध उपाय वापरून त्यांना पिटाळून लावतो. त्यामुळे पीक सुरक्षित राहते आणि उत्पन्न चांगले मिळते. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT