रत्नागिरी ः रेल्वेस्टेशन, बसस्थानक अशा सार्वजनिक स्थळी वावरणार्या बेघर व्यक्तीना रविवारपासून हक्काची निवारा मिळू शकणार आहे. आठवडा बाजार येथील नागरी बेघर निवारा इमारतीचे 20 जुलै रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. तब्बल 75 बेघरांना याठिकाणी निवारा मिळणार आहे. या बेघरांना किंवा गरीबांना उद्योगपुरक मदतही रत्नागिरी नगर परिषदेकडून मिळणार असल्याचे राष्ट्रीय नागरी उपजीविका शहर अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत या योजनेतून रत्नागिरी नगर परिषदेमार्फत सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून तळमजला अधिक दोन मजल्यांची इमारत उभारण्यात आली आहे. सार्वजनिक स्थळांच्या ठिकाणी ऊन, पाऊस थंडीत जीवन कंठणार्या बेघरांना याठिकाणी निवारा मिळणार आहे. ही इमारत लवकरात लवकर होण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी तुषार बाबर, विद्यमान मुख्याधिकारी वैभव गारवे, नगर अभियंता यतिराज जाधव, उपजीविका अभियान समुदाय संघटक सारिका मिरकर, शहर अभियान व्यवस्थापक अश्फाक गारदी यांच्याकडून पाठपुरावा झाला. पालकमंत्री उदय सामंत या निवारा केंद्राचे रविवारी लोकार्पण करणार आहेत.