Chiplun News 
रत्नागिरी

Chiplun News | शिवाजी चौकातील ‘हायमास्ट दिव्यांची तारेवरची कसरत’

चिपळुणातील मुख्य चौकातील अवस्था; दिव्यांची तबकडी समपातळीत येणार कधी?

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : शहरातील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील हायमास्ट दिवे एका बाजूला कलंडल्याने प्रकाशझोत आकाशात तर अर्धा प्रकाश थेट जमिनीवर दिसून येत आहे. एकूण पाच दिवे असलेल्या हायमास्टवरील दोन दिवे जमिनीच्या तर तीन दिवे आकाशाच्या दिशेने वळल्याने हायमास्टच्या दिव्यांना स्वतःचा तोल सावरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याची उपरोधिक चर्चा नागरिकांतून सुरू झाली आहे.

वर्षभरापूर्वी हेच दिवे आडवातिडवा प्रकाशझोत टाकत होते. याकडे ‘पुढारी’ने लक्ष वेधले असता दुरुस्ती करण्यात आली. मात्र, गेले वर्षभर त्याकडे न.प.च्या विद्युत विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस हवेच्या झोताबरोबर या दिव्यांची तराजूसारखी वर-खाली होणाऱ्या प्रकारामुळे प्रकाशझोतही हलू लागला आहे.

शहरातील चोवीस तास वर्दळीचा प्रमुख चौक म्हणून छत्रपती शिवाजी चौकाची ओळख आहे. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक असते. मोठ्या प्रमाणात बाजारपेठेतील प्रमुख व्यावसायिक इमारती येथे आहेत. त्यामुळे ग्राहकांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते. या चौकात मोठ्या प्रमाणात विद्युत प्रकाशाची व्यवस्था व्हावी या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाकडून काही वर्षांपूर्वी तत्कालीन सदस्यांच्या निर्णयानुसार हायमास्ट उभारण्यात आला. या हायमास्टवर प्रखर असे पाच ते सहा एलईडी प्रकाशझोत टाकणारे दिवे लावण्यात आले. तसेच या दिव्यांना बंद आणि सुरू होणाऱ्या वेळांचे तांत्रिक नियोजन करण्यात आले.

काही वर्षे ते सुरळीत असताना न.प.चा कारभार प्रशासकीय ताब्यात गेला. त्यानंतर मात्र हायमास्टवरील दिवे बंद पडणे, दिवे लावलेल्या दांड्या तबकडीसहीत वाऱ्याच्या झोताबरोबर खाली-वर होणे, दिव्यांची प्रकाशझोताची दिशा भलतीकडेच जाणे असे प्रकार वारंवार घडू लागले. मध्यंतरात ऐन दिवाळीच्या सुमारास गतवर्षी चार ते पाच दिव्यांपैकी केवळ एक-दोनच दिवे लुकलुकत होते. त्यापैकी एक दिवा आकाशाकडे प्रकाशझोत टाकत होता तर दुसरा दिवा हायमास्टच्या खालीच प्रकाशझोत टाकत होता. याकडे ‘पुढारी’ने लक्ष वेधले असता त्याची संबंधितांनी दखल घेऊन तात्पुरती दुरुस्ती करून दिवे सरळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा केलेला प्रयत्न काही महिन्यातच अपयशी ठरला. पुन्हा एकदा या दिव्यांनी प्रकाशझोत टाकण्याची आपली दिशा बदलण्यास सुरुवात केली आहे. योग्य पद्धतीने दिव्यांची तबकडी मजबूत स्थितीत न लावल्याने वाऱ्याच्या झोताने हे दिवे वर-खाली व भिंगरीसारखे आजूबाजूला प्रकाशझोत टाकत सुरू आहेत.

सद्यस्थितीत चार ते पाचपैकी एक ते दोन दिवे खालच्या बाजूला कलंडले आहेत तर उर्वरित दिवे वरच्या बाजूला सरकले आहेत. एखाद्या तराजूची एक बाजू खाली व एक वर अशी स्थिती दिसून येते. तशाच पद्धतीने एका बाजूला खाली कलंडलेले तर दुसऱ्या बाजूला वर गेलेले दिवे यांच्या प्रकाशाचा चौकात कुठेही ताळमेळ दिसून येत नाही. एखादी व्यक्ती हातात काठी घेऊन तारेवरची चालताना तोल सांभाळण्याची कसरत करीत असते त्याच पद्धतीने या दिव्यांची स्वतःचा तोल सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत सुरू करावी लागत असल्याची चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT