प्रवीण शिंदे
दापोली : कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा वादळाचे सावट दाटले असून, जोरदार वार्यांमुळे आणि उंच लाटांमुळे खोल समुद्रात जाणार्या हजारो मासेमारी नौका आता किनार्याच्या आश्रयाला उभ्या आहेत. परिणामी, संपूर्ण मासेमारी उद्योग ठप्प झाला असून, रोजची कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे. तर किनारपट्टीचे अर्थकारण अक्षरशः डळमळीत झाले आहे.
महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली असून, त्यावर सुमारे 17 हजार मासेमारी बोटी नोंदणीकृत आहेत. यापैकी 13 हजार बोटी या यंत्रसंचालित आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील किनारे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या वादळाच्या इशार्यामुळे सर्वच बंदरांवर बोटींच्या रांगा लागल्या आहेत.हर्णे, आंजर्ले, बुरोंडी, मुरूड, पाज, देवगड, विजयदुर्ग या किनार्यांवर हजारो नौका ठप्प आहेत. समुद्रकिनारे बोटींच्या गर्दीने गजबजले असले तरी वातावरणात भीतीचे सावट पसरले आहे. मच्छीमार, चालक, कामगार आणि व्यापाराशी निगडित हजारो हात सध्या बेरोजगार झाले आहेत. मासेमारी बंद असल्याने बाजारात मासळीचा पुरवठा घटला आहे. परिणामी स्थानिक बाजारात मासळीचे दर चढण्याची शक्यता आहे. बर्फ कारखाने, कोल्ड स्टोरेज, वाहतूकदार आणि प्रक्रिया उद्योग यांच्यावरही मंदीचे सावट आले आहे.
प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला असून, हवामान विभागाने वादळाचा इशारा कायम ठेवला आहे. हवामान स्थिर झाल्यावरच मासेमारी पुन्हा सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, किनार्यावर ठप्प झालेल्या बोटींचे दृश्य पाहून कोकणातील अर्थकारणाला बसलेला झटका स्पष्ट जाणवतो आहे.