आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी  
रत्नागिरी

Ratnagiri News : आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी

रस्त्याला भेगांमुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; पावसामुळे रस्ता खचण्याचा धोका

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाटात रस्त्याला गंभीर भेगा पडल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंबा घाटातून सर्वप्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीस पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अहवालानुसार, ६९.५०० ते ६९.६०० कि.मी.दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या भेगा पडल्या असून, लगतच सुमारे १०० मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ३१ जुलैपासून अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने व हलक्या प्रवासी वाहनांना नियंत्रित वेगाने आणि आवश्यक खबरदारी घेऊन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अवजड वाहनांसाठी रत्नागिरी-हातखंबा-पाली-अणुस्कुरा घाट-राजापूर/कोल्हापूर हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून, भुईबावडा व फोंडा घाटाचाही पर्याय उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

बाधित ठिकाणी इशारा फलक, रिफ्लेक्‍टिव्ह बॅरिकडस्‌ व ब्लिंकर्स बसवून रस्त्याची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

आंबा घाटातील बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर व संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT