मंडणगड : आंबेत पुलाला बार्जची धडक बसून महिना उलटला तरी पुलावरील अवजड वाहतूक अद्याप बंदच आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती असतानाही अवजड वाहतूक पूर्ववत का करण्यात आलेली नाही, असा संतप्त सवाल वाहनधारक व प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने पुलाच्या सद्यस्थितीबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. ६ जुलै रोजी बार्जची धडक बसल्यानंतर पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली होती. त्यानंतर हलकी वाहतूक सुरू करण्यात आली; मात्र अवजड वाहनांना अद्यापही पुलावरून प्रवेश देण्यात आलेला नाही. दरम्यान, पुलाचे रोबोटिक स्ट्रक्चरल ऑडिटही पूर्ण झाल्याची माहिती आहे. तरीही अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय का घेतला जात नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. अवजड वाहतूक बंद असल्याने दापोलीकडून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक एसटी फेऱ्या खेडमार्गे वळवण्यात आल्या आहेत. काही फेऱ्या मंडणगड-म्हाप्रळ-चिंबावे-महाडमार्गे सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
मंडणगडहून मुंबई, पुण्याकडे जाणारी वाहतूकही म्हाप्रळ-महाडमार्गे वळवण्यात आली आहे. पर्यायी मार्गामुळे प्रवासाचे अंतर आणि वेळ वाढल्याने प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मालवाहतुकीच्या अवजड वाहनांनाही पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्याने वाहतूकदारांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनधारक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
म्हाप्रळ-आंबेत पूल हा रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. दापोली, मंडणगड, माणगाव, गोरेगाव आणि म्हसळा तालुक्यांच्या दळणवळणासाठी या पुलाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे पुलाचे ऑडिट पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.