दापोली : दापोली तालुक्यात परतीच्या पावसाने गुरुवारी (दि.२३) सायंकाळपासून जोरदार धुमाकूळ घातला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांच्या कपाळावर चिंता उमटली आहे.
तालुक्यातील दापोली शहर आणि ग्रामीण भागात सायंकाळी अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. काही ठिकाणी वाऱ्याचा जोरही जाणवला. वीज चमकणे आणि कडकडाट यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले.परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे कापणी केलेले भाताचे पीक भिजण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे काही ठिकाणी शेतकरी वर्ग पावसातच कापलेले भात वाचवण्यासाठी शेतात धाव घेताना दिसून आले. पावसामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडीत झाला.
हवामान खात्याने पुढील २४ तास कोकण किनारपट्टीवर परतीच्या पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.