Rain Update
येत्या २४ तासांत जोरदार पाऊस file photo
रत्नागिरी

रत्नागिरी, सिंधुदुर्गला 'ऑरेंज अलर्ट'; येत्या २४ तासांत जोरदार पाऊस

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपल्यानंतर मंगळवारी पावसाचा जोर ओसरला. तरी अधूनमधून मध्यम ते जोरदार सरींचे सातत्य मात्र कायम होते. जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलेला असला तरी उद्यापासून जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज असल्याने रत्नागिरीसह सिधुदुर्ग जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील जलस्तर वाढल्यामुळे खेड, राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांत पुरस्थिती निर्माण झाली होती. चिपळुणातही जोरदार पावसाने वाशिष्ठी नदीचा जलस्तर वाढला होता. रत्नागिरी तालुक्यात काजळी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक भागात संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची भिती होती. खेड तालुक्यात जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदी अद्यापही इशारा पातळी वरुन वाहात आहे. जगुबडीची इशारा पातळी पाच मिटर असून जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाच्या नोंदीनुसार दुपारी १२ वाजता जगबुडीतील जलस्तर इशारा पातळीपासून १.२० मिटरने उंचावला होता तर कोदली नदीची इशारा पातळी ४.९० मिटर असून जलस्तर ४.९० वर म्हणजे इशारा पातळीवर स्थिरावला होता.

मंगळारी पावसाचा जोर कमी झाल्याने काजळी आणि शास्त्री नदीतील जलस्तर नियंत्रणात आला. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात ६०.३० मि.मी. च्या सरासरीने एकूण ५४२.७० मि.मी एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात ५५.९० मि.मी., दापोलीत ४७.०, खेड ६०, गुहागर ४६.५०, चिपळूण ६६, संगमेश्वर ६७.८०, रत्नागिरी ७२.६०, लांजा ६४. २० आणि राजापूर तालुक्यात ६२. २० मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २१७१ मि. मी. च्या सरासरीने पावसाने २० हजारी मजल गाठण्याची तयारी केली आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत ६४ टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद खेड तालुक्यात (२२९३ मि. मी.) तर सर्वात कमी पावसाची नोंद गुहागर तालुक्यात (२०७५ मि.मी.) झाली आहे.

SCROLL FOR NEXT