Hapus Mango Pudhari
रत्नागिरी

‌Hapus mango : ‘बॅगिंग‌’ तंत्रज्ञान उंचावणार हापूसचा दर्जा

दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा यशस्वी प्रयोग

पुढारी वृत्तसेवा

दापोली : हवामान बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा उत्पादनावर होत आहे. यावर्षीतर मोठ्या प्रमाणात मोहोर येऊनदेखील फळधारणा झाली नाही. मोहोर गळून पडला. त्यावर उपाय शोधण्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने बॅगिंग तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी केला आहे.

तालुक्यातील पांगारी, वाकवली परिसरात 198 एकरावर हापूस आंब्याची बाग आहे. 1980 ते 1985 या कालावधीत सुमारे आठ हजार हापूस आंब्याची झाडे याठिकाणी लावण्यात आली. सध्या या क्षेत्रावर 6 हजार 235 झाडे उत्पादनक्षम आहेत. हे क्षेत्र विद्यापीठाचे प्रायोगिक क्षेत्र आहे. याठिकाणी हापूस आंबा व अन्य पिकांवर वेगवेगळे प्रयोग केले जातात.

कोकण कृषी विद्यापीठाचे योगेश परूळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, वाकवली येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील काही झाडांवर हा प्रयोग करण्यात आला. लगडलेल्या आंब्यांना बॅगांचे आवरण देण्यात आले. कागद किंवा बाजारात मिळणाऱ्या कापडी पिशव्यांच्या माध्यमातून आपल्याला हे बॅगिंग करता येऊ शकते. त्यातून फळांचे संरक्षण होऊन गुणवत्ता वाढते. या बॅगा फळधारणा झाल्यानंतर फळ सुपारी ते अंडाकृती असेपर्यंत त्या पिशव्या लावाव्यात. हापूस आंब्यावर चिकामुळे पडणारे डाग बॅग लावल्यास दिसत नाहीत. फळमाशीचा प्रादुर्भाव होत नाही. कोणत्याही रोगाचा या फळावर परिणाम होत नाही आणि फळ आकर्षक रंगाचे तयार होते. ज्या फळांना बॅगिंग केले जाते त्या फळाचे वजन सुमारे 10 टक्क्यानी वाढते. यावेळी प्रक्षेत्र संचालक अरुण माने, भाजीपाला विशेषतज्ज्ञ योगेश परूळेकर, प्रक्षेत्रप्रमुख डॉ. संदीप महाडिक, जनसंपर्क अधिकारी डॉ. सखाराम देसाई उपस्थित होतेे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT