चिपळूणमध्ये 17 लाखांचा गुटखा जप्त File Photo
रत्नागिरी

Chiplun Gutkha Seizure | चिपळूणमध्ये 17 लाखांचा गुटखा जप्त

मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे पोलिसांची कारवाई; गुटखा रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई करत 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. कापसाळ येथे गुरुवारी रात्री 8.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गुटखा वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी (क्रमांक नमूद नाही) पोलिसांनी पकडली. पोलिसांनी मुद्देमालासह एकाला अटक केली आहे. या घटनेमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

चिपळूण शहरात अनेक दिवसांपासून गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. शहरातील टपरींवर सर्रास गुटखा विकला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. अन्न व औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चिपळूणवासीयांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

गुरुवारी रात्री चिपळूण पोलिसांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुटख्याची गाडी चिपळूणमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कापसाळ येथे संशयास्पद बोलेरो पिकअप गाडी थांबवली. गाडीची तपासणी केली असता, त्यात गुटखा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ गाडी जप्त करून चालकाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 16 लाख 94 हजार रुपये आहे, तर बोलेरो पिकअप गाडीची किंमत 7 लाख रुपये आहे. त्यामुळे एकूण 23 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सज्जन रामचंद्र नेवगी (वय 35, रा. इंसुली, सावंतवाडी) या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. चालकाला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हवालदार वृषाल शेटकर, पोलिस हवालदार संदीप मानके, पोलिस नाईक रोशन पवार यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी आता या गुटखा प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. हा गुटखा नेमका कोणत्या व्यावसायिकाला देणार होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच, या गुटखा रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे, याचाही तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्याची गरज

गुटखाबंदी आणि अवैध वाहतूक: महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असूनही, त्याची अवैध वाहतूक आणि विक्री सर्रासपणे सुरू आहे. विशेषतः मुंबई-गोवा महामार्गावर अशा प्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे, जेणेकरून गुटखा विक्री आणि वाहतुकीला आळा बसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT