बंदुकीतील छरा काच फोडून किचनमध्ये 
रत्नागिरी

Ratnagiri : बंदुकीतील छरा काच फोडून किचनमध्ये

चिपळुणातील उपनगर गोवळकोट येथील घटनेने सर्वत्र उडाली खळबळ

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : शहरातील भर नागरी वस्तीत असलेल्या एका हायलाईफ या बहुमजली सदनिकेत वास्तव्यास असूलेल्या एका रहिवाशाच्या किचनच्या खिडकीची काच फोडून बंदुकीतील छरा सदनिकेत घुसल्याची घटना आज (दि. 29) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या भातशेतीच्या भागातून छर्‍याच्या बंदुकीतून हा छरा थेट सदनिकेत घुसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, या घटनेने चिपळूण शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. घटना घडताच काही वेळेतच चिपळूण पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व शिकारीच्या हेतूने बंदुकीतील छरा उडविला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.

शहरातील गोवाळकोट रोड परिसरातील हायलाईफ बिल्डिंगमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पहिल्या मजल्यावर राहणार्‍या अशरफ तांबे यांच्या किचनमध्ये एक बंदुकीची गोळी खिडकीची काच फोडून आत शिरली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर या बाबत उलटसुलट चर्चादेखील सुरू झाली होती.

बंदुकीतून सुटलेल्या छर्‍यामुळे तांबे यांच्या फ्लॅटमधील किचनच्या खिडकीला छिद्र पडले आणि खिडकीच्या खालील बाजूस छर्‍याची गोळी पडलेली दिसली. या घटनेची माहिती तत्काळ चिपळूण पोलिस ठाण्यात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. अशरफ तांबे यांच्या घराशेजारील शेतातून शिकारीच्या उद्देशाने ही गोळी झाडण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. नागरी वस्तीमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

या बाबत तक्रारदार साजिद सरगुरो यांनी माहिती देताना सांगितले की, मला सकाळी पावणे अकराच्या सुमारास फोन आला की, आमच्या खिडकीतून गोळी आत आली आहे आणि काच फुटली आहे. कोणीतरी इथे शिकार करत असावे असा आमचा अंदाज आहे. आम्ही आवाज दिल्यावर ते पळून गेले. ते पुढे म्हणाले, आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे शेती आहे, जिथे सध्या भात लावणीचे काम सुरू आहे. याच भागातून ही छर्‍याची गोळी आली असावी. दरम्यान, शहर परिसरात छर्‍याची बंदूक वापरून छोट्या प्राणी, पक्ष्यांची शिकार करण्याचा छंद जोपासणारे अनेकजण आहेत. काहीजण शेतीच्या रक्षणासाठी छर्‍याची बंदूक वापरतात तर काहीजण छोट्या-मोठ्या वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी देखील बंदुकीचा वापर होतो. त्यामुळे छर्‍याची बंदूक वापरणारे कोण-कोण आहेत? याची आता चौकशी होणे गरजेचे आहे. कारण चिपळूण शहर परिसरात असलेल्या डोंगराळ जंगल भागात शिकार करीत असल्याचे चर्चेतून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT