देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येेथे महावितरणच्या तुटून पडलेल्या विद्युत वाहिनाचा शॉक लागून आजीचा मृत्यू झाला, तर नातू गंभीर जखमी होण्याची घटना गुरुवारी (5 जून) सकाळच्या सुमारास घडली. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
हृदया शांताराम मोरे (वय 70) या असे मृत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे , तर त्यांचा नातू ओम प्रकाश मोरे गंभीर जखमी झाला आहे.
सकाळच्या सुमारास हृदया मोरे घराजवळ काम करत असताना तिथे तुटून पडलेली महावितरणची विद्युत वाहिनी त्यांच्या संपर्कात आली. विजेचा धक्का लागल्याने त्या जागीच कोसळल्या. यावेळी त्यांचा नातू ओम मोरे आजीला वाचवण्यास धावला असता, त्यालाही विजेचा धक्कालागून गंभीर इजा झाली.
यानंतर ओमचे वडील प्रकाश मोरे व नातेवाईक गणेश मोरे यांनी दोघांना तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी हृदया मोरे यांना मृत घोषित केले, तर ओम मोरेला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले. या घटनेनंतर ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्रात धाव घेत महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा तीव्र निषेध केला.
या घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी तत्काळ तहसीलदार, महावितरण अभियंता व पोलीस प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले. मृत महिलेच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी व जखमी ओम मोरेच्या उपचारासाठी तत्काळ मदत करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला हालचाली करण्यास भाग पाडले आहे.
ग्रामस्थांनी घटनास्थळी उपस्थित झालेल्या महावितरणच्या कर्मचार्यांना जाब विचारला. या अपघाताला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, मृत महिलेच्या कुटुंबाला शासकीय नुकसानभरपाई मिळावी, तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली.