रत्‍नागिरी : भाजपाच्‍या मेळाव्‍यात मार्गदर्शन करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. 
रत्नागिरी

Chandrashekhar Bawankule : समाजाच्‍या शेवटच्‍या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; भारतीय जनता पक्षाचा रत्नागिरीत कार्यकर्ता मेळावा उत्‍साहात

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कार्यकर्त्यांच्या अहोरात्र आणि निष्ठावान मेहनतीमुळेच आज महाराष्ट्रात महायुतीचे सर्वात भक्कम सरकार सत्तेत आले असून, या सत्तेचा वापर शासनाच्‍या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी केला जात असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरीतील कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करताना बावनकुळे पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत पक्ष संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी जे रक्ताचे पाणी केले त्यामुळेच आज राज्याला हे ऐतिहासिक बहुमत मिळाले आहे. जनतेला दिलेली सर्व वचने पूर्ण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. पहिल्याच निर्णयात ३३ लाख शेतकऱ्यांचे ३५ हजार कोटींचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात आले. तसेच पंधरा वर्षांपासूनची वीज बिलाची टांगती तलवार दूर करत, ४५ लाख शेतकऱ्यांचे ४८ हजार कोटींचे वीज बिल माफ करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने क्रांतिकारी पावले उचलली असून, शेतमजूर महिलांना 'शेतकरी दर्जा' आणि 'जिजाऊ महिला सक्षमीकरण योजने'तून बचत गटांना अवघ्या एका रुपयात जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​रत्नागिरीच्या विकासावर बोलताना ना. बावनकुळे यांनी पर्यटन विकास, कोस्टल रोडची निर्मिती आणि मासेमारी व्यवसायाला बळकट करण्यावर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न गोळा करावेत आणि ते मार्गी लावण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनीही आपले विचार मांडले. रत्नागिरीत भाजपची ताकद वेगाने वाढत असून तळागाळातील जनता पक्षाशी जोडली जात असल्याचे ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांचा कोकणात सकारात्मक परिणाम दिसत आहे. मात्र पारंपरिक व्यवसायांसमोरील अडचणी, नद्यांचे मॅपिंग, गाळ काढणे, कुळ कायदे आणि मंदिरांच्या जमिनींच्या प्रश्नांवर त्यांनी शासनाचे लक्ष वेधून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनीही ग्रामीण भागातील प्रश्‍न तत्‍काळ सुटत असल्‍याबद्दल शासनाचे कौतूक केले. तसेच भाजप चांगला वाढत असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

​यावेळी आमदार प्रसाद लाड, विक्रांत पाटील, प्रमोद जठार, महिला सरचिटणीस ऐश्वर्या जठार, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, वैभव खेडेकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, राजू भाटलेकर, प्रमोद अधटराव, नीलेश सुर्वे, अभी गुरव, रुपेश कदम, संतोष गांगण, विनोद मस्के, स्वप्ना यादव, विनोद भुरण, दादा दळी, विवेक सुर्वे यांच्‍यासह प्रमुख पदाधिकारी आणि जिल्‍ह्यातून आलेले स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT