State Excise Department Pudhari
रत्नागिरी

Rajapur Excise Raid | राजापुरात गोवा बनावटीच्या दारूचा अवैध साठा; १ कोटी ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

तळगावातील हॉटेलच्या मागील खोलीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; दोन संशयित ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Goa Made Liquor Seized Rajapur

राजापूर : तालुक्यातील तळगाव येथील हॉटेल श्री. स्वामी समर्थच्या मागील खोलीत गोवा बनावटीची दारू साठवून तिची अवैध विक्री व बाटलीबंद करण्याच्या तयारीत असलेल्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. बुधवारी (दि. १६) झालेल्या या कारवाईत दारूसह बॉटलिंगसाठी लागणारे साहित्य आणि इतर वस्तू असा एकूण १ कोटी ५ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला तळगाव येथील संबंधित हॉटेलच्या मागील खोलीत गोवा बनावटीची दारू साठवून तिची अवैध बाटलीबंद विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार रत्नागिरी भरारी पथक आणि कणकवली विभागाच्या निरीक्षकांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

कारवाईदरम्यान खोलीत गोवा बनावटीच्या ‘रॉयल ब्ल्यू व्हिस्की’ लेबलचे ५६ बॉक्स आढळले. तसेच दोन ३० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये ६० लिटर तयार मद्याचा ब्लेंड जप्त करण्यात आला. याशिवाय बॉटलिंग मशीन, ८६ हजार ४०० पत्र्याची बुचे, रिकामे बॉक्स, कागदी पुठ्ठ्याचे बॉक्स, विविध मद्यांच्या लेबलचे रोल आणि मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या सापडल्या.

पथकाने १,८०० बॉक्समध्ये ठेवलेल्या ८६ हजार ४०० रिकाम्या बाटल्या, तसेच ३५ प्लास्टिक पिशव्यांमधील १,६८० काचेच्या बाटल्या जप्त केल्या. यासोबत पाण्याच्या टाक्या, प्लास्टिक ट्रे, कागदी जाळी आणि इतर बॉटलिंग साहित्य व दोन मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी दिनेश शांताराम जैतापकर (रा. तळगाव, राजापूर) आणि चंदन ऊर्फ शंकर बाळू पाटील (रा. कुळथलीन, फ्रान्सिसवाडी, पणजी, गोवा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करीत आहेत. अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा साठवणुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे विभागाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT