दहिवलीत घाग बंधूंची १६ वर्षांपासून जलसंवर्धनाची तपश्चर्या 
रत्नागिरी

Ratnagiri News : दहिवलीत घाग बंधूंची १६ वर्षांपासून जलसंवर्धनाची तपश्चर्या

दरवर्षी स्वखर्चाने १२ ते १५ वनराई बंधारे; वन्यप्राण्यांसाठीही पाण्याची व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील दहिवली बुद्रुक येथील विकास वसंतराव घाग आणि त्यांचे बंधू महेश वसंतराव घाग गेल्या १६ वर्षांपासून जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे कार्य निःस्वार्थपणे करत आहेत. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता दरवर्षी स्वखर्चाने १२ ते १५ वनराई बंधारे उभारण्याचा त्यांचा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरवणे, भूजलपातळी वाढवणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दहिवली बुद्रुकसह परिसरातील अन्य गावांमध्ये आणि रस्त्यांच्या कामांच्या ठिकाणीही घाग बंधू वनराई बंधारे उभारतात. जलसंवर्धनाबरोबरच उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्याने वन्यप्राण्यांची होणारी पाण्यासाठीची भटकंती कमी करण्यासाठी ते दुर्गम जंगल परिसरात पाण्याचे डुरे खणतात. तसेच इतर नागरिकांनाही वनराई बंधारे उभारणी आणि पाणी नियोजनाबाबत आवश्यक असे मार्गदर्शन करतात.

प्रशासकीय स्तरावरही गौरवविकास घाग यांच्या जलसंवर्धन कार्याची दखल पंचायत समिती चिपळूणने २०१५-१६ मध्ये घेतली होती. दहिवली येथे दहा बंधारे उभारण्यासाठी केलेले सहकार्य आणि वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले होते. तत्कालीन सरपंच रुपेश रवींद घाग यांनी त्यांच्या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून पुढाकार घेतला होता.

बदलते हवामान आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता घाग बंधूंचे सातत्यपूर्ण कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. शासनाच्या योजनांबरोबरच नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतल्यास गावागावांत जलसमृद्धी निर्माण होऊ शकते, हे त्यांच्या कार्यातून अधोरेखित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT