देशी गायीला घरोघरी नेणारा ‘गव्य गणेश’ 
रत्नागिरी

Ratnagiri : देशी गायीला घरोघरी नेणारा ‘गव्य गणेश’

भारतीय संस्कृतीचे जतन करणारे एक आगळे-वेगळे पाऊल

पुढारी वृत्तसेवा
दीपक शिंगण

रत्नागिरी : यंदाच्या गणेशोत्सोवात पर्यावरणाची कास धरणारे आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणारे एक आगळे-वेगळे पाऊल रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी येथील गो-प्रेेमी गणेशमूर्ती कारागीर कुटुंबाने उचलले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात ‘गव्य गणेशाची’ स्थापना करून गायीचे शेण तसेच शेतातील मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती घरोघरी पोहोचवण्याचा आणि त्या माध्यमातून देशी गायीला घरोघरी नेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. यामुळे एकीकडे पर्यावरणाची काळजी घेतली जाईल, तर दुसरीकडे देशी गाईचे महत्त्व आणि तिचे विविध उपयोग जनसामान्यांपर्यंत पोहोचवता येतील, अशी त्या मागची धारणा आहे. गायीच्या शेणापासून बनवलेल्या गणेशमूर्ती या पूर्णपणे नैसर्गिक आणि पवित्र असतात आणि त्या पाण्यात सहज विरघळतात. यामुळे जलप्रदूषण टाळता येते. विसर्जनानंतर या मूर्तींचे मिश्रण खत म्हणून शेतीत वापरता येते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी शेणापासून मूर्ती घडवलेल्या दीपाली प्रणित याचे कुटुंबीय तालुक्यातील हरचेरी गावात देशी गाईंचे गोवसंर्धन केंद्र चालवते.

देशी गायीचे शेण तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारी शेतातील माती वापरून केलेल्या मूर्तींच्या निर्मितीमुळे ग्रामीण भागातील कारागिरांना आणि गो-शाळांना रोजगार उपलब्ध होतो आहे. ‘गव्य गणेशा’च्या स्थापनेसोबतच, देशी गाईचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रत्येक घरात देशी गाय असावी, असा एक मोठा संकल्प या गणेशोत्सवात करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गाईला मातेसमान मानले जाते आणि तिचे अनेक फायदे आहेत. देशी गाय केवळ दूध देत नाही, तर ती अनेक प्रकारे मानवासाठी उपयुक्त आहे. तिचे ‘पंचगव्य’ (दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण) आयुर्वेदात औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे.

देशी गाईचे दूध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. ते पचायला हलके असते आणि अनेक रोगांवर उपकारक ठरते. गाईचे शेण (गोमय) हे उत्तम नैसर्गिक खत आहे. याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांचा वापर टाळता येतो, ज्यामुळे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळते. शेणाचा वापर करून बायोगॅस तयार करता येतो, ज्यामुळे घरासाठी ऊर्जा मिळते आणि इंधनाचा खर्च वाचतो. गोमूत्र आणि शेण अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते. अनेक गंभीर रोगांवर उपचारासाठी त्यांचा वापर केला जातो. गाय पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करते. तिचे शेण आणि गोमूत्र जमिनीची गुणवत्ता सुधारते आणि परिसंस्थेला समृद्ध करते. देशी गोपालन हा ग्रामीण भागातील लोकांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत ठरू शकतो, ज्यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरणही होते.

पर्यावरणपूरक ‘गव्य गणेश’ काळाची गरज

गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिस (झजझ) पासून बनवलेल्या गणेशमूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे नद्या, तलाव आणि समुद्रातील जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण होतो. यावर एक उत्तम पर्याय म्हणून गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गणेशमूर्तींचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT