सावधान! गणपतीपुळे समुद्र बनलाय धोकादायक 
रत्नागिरी

सावधान! गणपतीपुळे समुद्र बनलाय धोकादायक

Ganpatipule| चाळ, खड्ड्यांमुळे घडताहेत दुर्घटना : स्थानिकांची माहिती, पोलिसांनी लावलेत सूचना फलक

पुढारी वृत्तसेवा

वैभव पवार

गणपतीपुळे : कोकणातील सर्वात लोकप्रिय व सुंदर असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर मागील दिवाळी पर्यटन हंगामापासून बुडणाऱ्या पर्यटकांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या घटनांमध्ये तीन पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यूला सामोरे जावे लागले आहे, तर काहींना वाचवण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांना यश आले. त्याचबरोबर समुद्रात बुडून एकजण अद्याप बेपत्ता आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे समुद्राची नेमकी काय स्थिती आहे याबाबत जाणकार स्थानिक व्यावसायिकांकडून माहिती जाणून घेतली असता मागील अवकाळी पाऊस आणि समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तसेच वादळ सदृश्य स्थिती यामुळे गणपतीपुळे समुद्राची स्थिती पूर्णतः बदललेली आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या समुद्राच्या भरती व ओहोटीमध्येदेखील मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येत असून भरतीचे पाणी सकाळच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यापर्यंत असते. त्यानंतर ओहोटीच्या सुमारास समुद्राचे पाणी पूर्णतः खाली गेल्यानंतर मधल्या भागात गुडघाभर पाणी साचून राहते, तर समुद्राचे पाणी पूर्णतः मागे गेल्यानंतर अगदी उंचच उंच लाटा पुन्हा उसळी घेत दिसून येते. तसेच लाटांच्या पाण्याला वेगदेखील असल्याचे दिसून येते. असे असतानाच यंदा वातावरणातील भौगोलिक स्थितीमुळे सध्या समुद्रात चाळ व खड्डे निर्माण झाले असून समुद्र स्नानासाठी उतरणाऱ्या पर्यटकांना त्यात अडकून पडल्यानंतर बाहेर येता येत नाही. त्यामुळे बुडण्याचे प्रकार वाढत चालले असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

तसेच त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी बुडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचेदेखील सांगण्यात आले आहे, परंतु त्यात महत्वाचे म्हणजे काही अतिउत्साही पर्यटकांचा बेजबाबदारपणे आणि बेफिकीरपणे समुद्रात बुडून होणाऱ्या घटनेला अधिक कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील परिस्थिती आणखी गंभीर बनत असल्याचेदेखील सांगण्यात आले आहे.

एकूणच समुद्रात बुडणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन दुर्घटना टाळता याव्यात या उद्देशाने आता रत्नागिरी जिल्हा आणि जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर ठिकठिकाणी जाहीर सूचना व आवाहन फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये पर्यटकांना विनंती करण्यात आली आहे की, श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक आहे. गणपतीपुळे समुद्रामध्ये दरवर्षी बुडून मृत्यू होणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे समुद्राच्या खोल पाण्यात उतरून स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका. आपला जीव आपल्या कुटुंबासाठी मोलाचा आहे. त्यामुळे सावध रहा, सतर्क रहा, घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे असा भावनिक संदेश पोलिस यंत्रणेकडून देण्यात आला आहे .

सध्या समुद्राची बदललेली भौगोलिक स्थिती लक्षात घेता येणाऱ्या पर्यटकांनी समुद्र स्थानाचा आनंद लुटताना अगदी कमी पाण्यातच उतरणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच येथील सुंदर समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटताना समुद्र स्नानाचा आनंद कमीप्रमाणात घ्यावा, जेणेकरून सुरक्षितरित्या पर्यटनाचा आनंद घेतल्याचे सार्थक होईल असे मत व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT