गणपतीपुळे : प्रतिवर्षाप्रमाणे गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात दि. 19 जानेवारी ते रविवार दि. 25 जानेवारी या कालावधीत संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या वतीने माघी गणेशोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. यानिमित्ताने स्वयंभू श्रींचे मंदिराला आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली असून देवस्थान समितीकडून अतिशय नेटके नियोजन व आयोजन करण्यात आहे.
या उत्सवाची सुरवात 19 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत श्रींची महापूजा व प्रसादाने होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत गणेशयाग देवता स्थापना करण्यात येणार आहे. सोमवार ते शुक्रवार, दिनांक 19 ते 23 जानेवारी दरम्यान दररोज सायंकाळी 7 ते 7.30 या वेळेत सामुदायिक आरती व मंत्रपुष्प होणार असून त्यानंतर सायंकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. ह. भ. प. श्री श्रीपाद उर्फ विनोदबुवा खोंड (रा. उमरेड, जि. नागपूर) यांचे कीर्तन या कालावधीत होणार आहे.मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी माघ शुद्ध द्वितीया दिनी सकाळी 7 ते 12 या वेळेत कलशारोहण व वर्धा पनदिनानिमित्त गणेशयागाची पूर्णाहुती होणार आहे. बुधवार, दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 11 ते 12 या वेळेत सहस्त्र मोदक समर्पणाचा धार्मिक विधी पार पडणार आहे.
दि. 22 जानेवारी रोजी माघी यात्रेनिमित्त दुपारी 4 ते 6 या वेळेत श्रींची पालखी प्रदक्षिणा (मिरवणूक) काढण्यात येणार असून भाविकांसाठी हा विशेष आकर्षणाचा क्षण ठरणार आहे.शनिवार दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता नमिला गणपती या भावगीते नाट्यगीते व भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्री.अभिषेक काळे (सांगली) व सौ. संपदा माने (मुंबई) हे कलाकार सादरीकरण करणार आहेत.
दि. 25 जानेवारी रोजी रथ सप्तमीच्या दिवशी दुपारी 11.30 ते 2 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी रात्री ठीक 10 वाजता श्रीनिवास भणगे लिखित शांतेचं कार्ट चालू आहे हे धमाल विनोदी नाटक गणेश प्रासादिक नाट्यमंडळ, गणपतीपुळे यांच्यावतीने सादर करण्यात येणार असून यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी व नागरिकांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.