वैभव पवार
गणपतीपुळे : जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र गणपतीपुळे दिवाळी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे . दिवाळी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर येथील सर्वच लहान -मोठ्या पर्यटन व्यावसायिकांची आपले व्यवसाय सुसज्ज व तत्पर ठेवण्यासाठी मोठी लगबग सुरू झाली असून तशा प्रकारे जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र गणपतीपुळे परिसरात दिसत आहे. तसेच येथील पर्यटनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या हॉटेल्स व लॉजिंगमधून आकर्षक रंगरंगोटी व सजावटीवर भर देण्यात आला आहे. पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व हॉटेल्स व लॉजिंग व्यावसायिकांकडून चांगल्या प्रकारे तयारी करण्यात आली आहे. एकूणच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांकडून आगाऊ बुकिंगलाही सुरुवात होत असल्याचे सांगण्यात आले.
येथील खासगी हॉटेल्स व लॉजिंगसह शासकीय असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन निवासातही देश-विदेशातील पर्यटकांची मोठी पसंती दरवर्षी दिवाळी पर्यटन हंगामात मिळत असते. त्यामुळे यंदाही दिवाळी पर्यटन हंगामात पर्यटकांच्या निवास आरक्षणाला सुरुवात झाल्याचे एमटीडीसी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. गणपतीपुळे दिवाळी पर्यटन हंगामात पर्यटनासह येथील स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी उसळत असल्याने संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था चोख व सुलभ पद्धतीने होण्यासाठी नियोजनबद्ध आखणी करण्यात आली आहे.
गणपतीपुळे येथे दरवर्षी दिवाळी पर्यटन हंगाम पर्यटकांच्या मोठ्या गर्दीने फुलून व गजबजून जातो. या कालावधीत विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये आणि विशेषतः शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटुंबांसहित पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यामध्ये विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांपेक्षा गणपतीपुळे पर्यटन स्थळाला पर्यटकांची विशेष पसंती मिळते. त्यामुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पर्यटकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, या दृष्टीने पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले आहेत.
त्या दृष्टीने दिवाळीच्या अगोदरच काही दिवस आधी तशा प्रकारे तयारी सुरू केली जात असल्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे यंदाही येथील सर्वच लहान-मोठ्या पर्यटन व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली असून पर्यटकांच्या सेवेसाठी ते सज्ज झाले आहेत. येथील लॉजिंग व्यावसायिकांबरोबरच समुद्रकिनाऱ्यावरील लहान व्यवसायिकांमध्ये उंट, घोडे, ए टीव्ही बाईक, फोटोग्राफी, सरबत विक्रेते, शहाळी विक्रेते आणि अन्य लहान व्यावसायिक पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सुक झाले आहेत.