राजापूरमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाने ३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.  file photo
रत्नागिरी

राजापूर : पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ३ कोटींचा निधी

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : राज्य सरकारच्या माध्यमातून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्रातील राजापूर व लांजा तालुक्यांमध्ये असणाऱ्या पर्यटनस्थळांचा पुनर्विकास करण्याच्या उद्देशाने स्थानिक पर्यटनाला चालना देण्याचे धोरण राबवत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी तब्बल ३ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

याबद्दल या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार, अशा शब्दांत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्राच्या भाजपा नेत्या राजश्री (उल्काताई) विश्वासराव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, प्रभानवल्ली, ता. लांजा येथील श्री बल्लाळ गणेश मंदिराच्या परिसर विकास व सुशोभीकरणासाठी २५ लाख, मौजे कोट येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५० लाख, श्री कनकादित्य मंदिराच्या सुशोभीकरणासाठी २५ लाख, रायपाटण येथील दत्त दासांचे स्वामी महादेवनंदजी दत्त मंदिर येथील सुशोभीकरण व मूलभूत सुविधांसाठी २५ लाखाचा निधी मिळाला आहे.

श्री गिरेश्वर मंदिर अणसुरे येथील विकासकामांसाठी २० लाख, आडिवरे श्री महाकाली मंदिर विकसनासाठी २५ लाख, आंबोळगडावर पर्यटकांना उत्तम सेवांचा पुरवठा करण्यासाठी २५ लाख, यशवंतगडावरील विकासकामांसाठी २५ लाख, कुवे येथील गणेश मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने पायाभूत सेवा निर्माण करण्यासाठी ३० लाख, सागवे येथील कात्रादेवीच्या परिसर विकासासाठी २५ लाख निधी मिळाला आहे. साटवली येथील शिवकालीन गढीवर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याने राजापूर विधानसभा क्षेत्रातील अनेक भागांमध्ये पर्यटनाला चालना मिळणार आहे.

याचा फायदा थेट स्थानिकांना होणार असल्याचे त्या म्हणाल्या. मागील अनेक वर्षे प्रत्यक्ष मतदारसंघात प्रवास केल्यानंतर लोकांच्या मागण्या काय आहेत व त्या योग्य पद्धतीने मांडून आपल्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केले. पर्यटनस्थळे आजपर्यंत संपूर्ण क्षमतेने कार्यरत झाली पाहिजेत यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला, त्याला यश आल्याचे त्यांनी सांगितले.राजापूर व लांजा तालुक्यांतील जवळपास ११ पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

आमचे राज्यातील शीर्षस्थ नेते, माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्या सहकायनि आपल्या लोकांसाठी याहून अधिक निधी या विधानसभा क्षेत्रामध्ये आणू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT