खेड : खेड-आंबवली मार्गावरील मोहाने गावाच्या हद्दीतील अवैध वृक्षतोडीबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वन विभागाची यंत्रणा जागी झाली आहे. 25 सप्टेंबर रोजी तालुका वनाधिकारी उमेश भागवत व वनरक्षक वैभव काटेखाये यांनी अवैध वृक्षतोडीवर कारवाई करत पंचनामा केला.
पंचनाम्यात 25 हून अधिक झाडे परवानगीशिवाय तोडल्याचे समोर आले असून याबाबतचा सविस्तर अहवाल दापोलीचे वनक्षेत्रपाल पी. जी. पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. पवार यांनीही घटनास्थळी पाहणी करून झाडतोडीबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला असल्याचे सांगितले.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असली तरी जबाबदारांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि रस्त्यालगतची हरित पट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी या प्रकरणी कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.