दापोली : राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ, अवैध औषध विक्री आणि नियमबाह्य व्यवसायांवर कठोर कारवाईचा धडाका लावला असताना, दापोली तालुक्यात मात्र या कारवाईचे चित्र वेगळे असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दापोलीत काही महिन्यांपूर्वी खराब बनपाव तसेच ढोकळ्यामध्ये अळ्या आढळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मात्र अशा घटनांनंतरही प्रशासनाने नेमकी कोणती कारवाई केली, याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही तक्रारींच्या आधारे ग्रामीण भागातील लहान हॉटेल व्यावसायिक किंवा किरकोळ व्यवसायांवर अचानक धाडी टाकल्या जातात. मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या काही आस्थापनांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे ‘कायदा सर्वांसाठी समान आहे का?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, मुदतबाह्य वस्तूंची विक्री, परवान्यांतील अनियमितता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन याबाबत विविध तक्रारी असूनही प्रभावी तपासणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी प्रशासनाची कारवाई निवडक आणि पक्षपाती असल्याची भावना बळावत आहे.
याबाबत काही नागरिक आणि व्यावसायिकांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील किरकोळ तक्रारींच्या आधारावर सामान्य व्यावसायिकांना त्रास दिला जातो, मात्र मोठ्या आस्थापनांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नाही, असा आरोप या निवेदनातून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात ज्या धडाकेबाज पद्धतीने कारवाई सुरू आहे, त्याच निकषांवर दापोली आणि रत्नागिरी जिल्हा येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी व्हावी आणि सर्वांवर समान न्यायाने कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे; अन्यथा प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अस्वच्छतेकडे दुर्लक्ष का?
दापोलीतील काही बेकरी आणि हॉटेल व्यवसायांमध्ये अन्नपदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असल्याचे बोलले जाते. अचानक आणि सखोल तपासणी झाल्यास स्वच्छतेची वास्तविक स्थिती, अन्नसाठवणुकीतील त्रुटी, दुर्गंधीयुक्त परिसर, कर्मचाऱ्यांची स्वच्छता, तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड होऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र अशा मोठ्या आस्थापनांवर प्रभावी आणि दृश्यमान कारवाई होताना दिसत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.