Five Tourists from Sambhajinagar Drown at Ganpatipule Beach, Ratnagiri
गणपतीपुळे : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे आज (दि.२० जून) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. सध्या हे पाचही जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सकाळी १० च्या सुमारास घडली दुर्घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक ग्रुप गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास या ग्रुपमधील काही जण समुद्रात उतरले. मात्र, पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने पाच जण समुद्राच्या पाण्यात ओढले गेले आणि बुडाले.
स्थानिक नागरिक अन् जीवरक्षकांची धाव
पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने समुद्रात धाव घेतली. त्यांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला.
बचाव कार्यात पाण्याचा 'करंट' ठरतोय अडथळा
सध्या समुद्रात पाण्याचा करंट (पाण्याचा वेगवान प्रवाह) प्रचंड प्रमाणात आहे. समुद्राला उधाण असल्यासारखी परिस्थिती असल्याने आणि पाण्याचा प्रवाह खेचणारा असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत.