Drowning Death Pudhari Photo
रत्नागिरी

Ratnagiri Drowning Death | साडेपाच वर्षांत पाण्यात बुडून जिल्ह्यात 581 जणांनी प्राण गमावले

Ratnagiri Drowning Death | जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून येथे अनेक नद्या, खाड्या, धबधबे आणि तलाव पसरलेले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून येथे अनेक नद्या, खाड्या, धबधबे आणि तलाव पसरलेले आहेत. मात्र, निसर्गाचे हे सौंदर्य अनेकदा स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात पाण्यात पडून अथवा बुडून तब्बल ५८१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वर्षभरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये होणारे हे मृत्यू रोखण्याचे मोठे आव्हान आता स्थानिक प्रशासन आणि नागरिकांसमोर उभे राहिले आहे. पाण्यात बुडून होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी पाहता दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडत असल्याचे समोर येते. २०२१ या वर्षात जिल्ह्यात १०० जणांचा पाण्यात पडून किंवा बुडून मृत्यू झाला होता.

त्यानंतर २०२२ मध्ये ही संख्या वाढून १०१ वर पोहोचली. २०२३ मध्ये या घटनेत किंचित घट झाली आणि ९६ जणांचा जीव गेला. परंतु, २०२४ मध्ये या दुर्दैवी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून वर्षभरात ११२ जणांना आपला प्राण गमवावा लागला लागा. २०२५ मध्ये पुन्हा ९८ मृत्यूंची नोंद झाली, तर चालू २०२६ या वर्षात केवळ जुलै महिन्याखेरेपर्यंत तब्बल ७४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

या साडेपाच वर्षातील एकूण ५८१ मृत्यूंमागे विविध कारणे असल्याचे दिसून येते. यात समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेलेले पर्यटक, नद्या आणि खाडीपात्रात मासेमारी किंवा स्नानासाठी उतरलेले स्थानिक नागरिक, तसेच पावसाळ्यात पुराच्या पाण्यात अथवा शेतात साचलेल्या पाण्यात पडून घडलेल्या अपघातांचा समावेश आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना या निष्काळजीपणाामुळे आणि अपेक्षित धोक्यांमुळे प्राणाला मुकावे लागले आहे.
पर्यटन स्थळांवर आणि धोकादायक पाणवठ्यांवर प्रशासनाकडून सूचना फलक लावले जातात, तसेच जीवक्षक तैनात केले जातात. तरीही अनेकदा नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी अनोळखी पाणवठ्यांवर जाताना योग्य ती काळजी घेणे आणि पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे टाळणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT