रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय पोषण आहारासाठी पुरवठा होणाऱ्या तांदूळ आणि डाळीच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी होत असताना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक भूमिका घेतली आहे. गोदामे तसेच शाळांमध्ये अचानक तपासणी करून निकृष्ट धान्य आढळल्यास कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून शाळांमध्ये स्वच्छ, खडेमुक्त आणि चांगल्या प्रतीचे धान्य येत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. यासाठी शासनाच्या माध्यमातून पुरवठादारांकडून तांदूळ, डाळी व अन्य साहित्यांचा पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांत शाळांना मिळणारा तांदूळ पिवळसर, किडका तसेच त्यामध्ये खडे, कचरा आणि अळ्या आढळत असल्याच्या तक्रारी शिक्षक व पालकांकडून करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत एफडीएने पोषण आहाराच्या धान्याच्या गुणवत्तेकडे लक्ष केंद्रित केले. धान्याच्या गोदामांबरोबरच शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या धान्याचीही तपासणी करण्याची भूमिका घेण्यात आली. निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा केल्यास संबंधितांवर थेट कारवाई होऊ शकते. यामुळे पुरवठादारांमध्येही सावधगिरी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून अलीकडे शाळांमध्ये येणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. धान्य स्वच्छ केलेले असून, त्यामध्ये खडे अथवा कचरा नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. तसेच, धान्याच्या पोत्यांवर उत्पादकाचा पत्ता, पॅकिंग दिनांक आणि गुणवत्ता प्रमाणपत्राची माहितीही देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.