प्रवीण शिंदे
दापोली : दापोली तालुक्यातील शिरवणे भेकरेवाडी येथील शेतकरी विकास नारायण पाष्टे यांनी केळी लागवडीला माकड आणि वनरांच्या सततच्या त्रासावर देशी उपाय शोधला आहे. केळीच्या घडाभोवती त्यांनी मजबूत तारेची जाळी बांधून या उपद्रवी प्राण्यांपासून संरक्षणाची प्रभावी युक्ती राबवली आहे.
गतवर्षी पाष्टे यांनी त्यांच्या आठ गुंठे क्षेत्रात जी9 जातीची केळी, तसेच वेलची या जातीच्या केळीची लागवड केली आहे. सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करत त्यांनी केळी लागवड पूर्णपणे गो-कृपा अमृत सेंद्रिय खताच्या सहाय्याने केली आहे. यासोबतच त्यांनी सुपारी आणि काळीमिरीचे अंतरपीक घेऊन शेतीला अधिक उत्पन्नक्षम बनवले आहे.
माकड आणि वनरांच्या हल्ल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट होते, मात्र पाष्टे यांच्या या देशी झुगाडामुळे केळीचे घड सुरक्षित राहिले आहेत. त्यांच्या कल्पकतेचे कौतुक दापोली वन विभागानेही केले असून, हा उपाय इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग आणि सेंद्रिय शेतीबाबतची बांधिलकी यामुळे पाष्टे यांची पद्धत आता स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. शेती आणि फळपिकांच्या लागवडीची आवड मला पूर्वीपासूनच आहे. मात्र अलीकडे माकड आणि वानर यांच्या वाढत्या त्रासामुळे फळपिकांचे मोठे नुकसान होत होते. या समस्येवर उपाय म्हणून मी ही युक्ती शोधून काढली असून, तिचा मला चांगला फायदा झाला आहे, असे शेतकरी विकास पाष्टे यांनी सांगितले.