चिपळूण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्ज व वीज बिल माफी केल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर येणार आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ५६ लाख शेतकर्यांना तब्बत ३७ हजार कोटींचा लाभ होणार आहे. याशिवाय वीज बिल माफ योजनेतून शेतकर्यांची ४८ हजार कोटींची वीज बिल थकबाकीही शासनाने माफ केली आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही मोठी उपलब्धी असून यापुढे भाजपा जनतेच्या समस्या सोडविणार व सत्तेचा उपयोग समस्या निराकरणासाठी होणार, असा विश्वास विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
येथील भाजपा कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार जठार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच हा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार असल्याचे सांगितले.
आ. जठार म्हणाले, कृषी व वीज बिल माफी या ऐतिहासीक योजना आहेत. अहिल्याबाई होळकर योजनेतून ५० हजार रूपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे व शेतकर्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा फायदा मिळणार आहे. शासनाने या कर्जमुक्तीच्या जाचक अटी रद्द केल्या आहेत. या कर्जमाफी योजनेत दोन लाख रूपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी दोन लाख रूपयांची कर्जमाफी मिळेल. शेतकर्यांसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीज बिल आकारले जात नाही. मात्र त्यांची जुनी थकबाकी माफ केली आहे. आज कर्जमाफीव्यतिरिक्त शेतकर्यांना ९५ हजार कोटींचे सहाय्य दिले जात आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार वचनबद्ध आहे. शासन मागेल त्याला शेततळे देत असून अनेक योजना आणल्या आहेत. जलयुक्त शिवारमुळे शेतकरी तीन-तीन पिके घेऊ लागला आहे. सौरपंप, सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. कोणतीही निवडणूक नसताना मुख्यमंत्र्यांनी ही कर्जमाफी दिली आहे.
कोकणच्या प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले, लोटे औद्योगिक वसाहतीला पाण्याची समस्या जाणवते. या पार्श्वभूमीवर दोन धरणांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीला पाणी देण्यासाठी नियोजन करीत आहेात. कोयनेचे पाणी रत्नागिरी जिल्ह्याला नेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यापुढच्या काळात चिपळूण-कराड रेल्वेचा रखडलेला प्रश्नही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू व त्याचा अभ्यास करू. कोकणात अनेक उद्योग येतात, रोजगार देऊ अशा घोषणा होतात. मात्र, प्रत्यक्षात काम मिळत नाही. मात्र या पुढील काळात हक्काच्या शासकीय जागांवर कोकणी लोकांना स्थान दिले पाहिजे यासाठी आपण मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर, गटनेते व शहर मंडल अधिकारी शशिकांत मोदी, नगरसेवक शुभम पिसे, संदीप भिसे, रसिका देवळेकर, अंजली कदम आदी उपस्थित होते.