लांजा : तालुक्यात वकिलीचा बुरखा पांघरून एका सराईत भामट्याने शेतकर्याला तब्बल 45 हजार रुपयांना गंडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विश्वास संपादन करून विविध आमिषे दाखवत ही फसवणूक करण्यात आली असून, लांजा पोलिसांनी या तोतया वकिलास बेड्या ठोकल्या आहेत.
धक्कादायक म्हणजे, हा आरोपी सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. आसगे मांडवकरवाडी येथील शेतकरी बाबाजी बुधाजी कोलापटे (वय 62) यांनी याप्रकरणी लांजा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जीवन गणपत जाधव (वय 55, रा. नाखरे,ता. जि. रत्नागिरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जाधव याने आपण वकील असल्याचे भासवून कोलापटे यांचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर पद्धतशीरपणे त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी जीवन जाधवला अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे केवळ एका गुन्ह्याचा छडा लागला नसून, अनेक जिल्ह्यांमध्ये फसवणुकीचे जाळे विणणार्या सराईत गुन्हेगाराला रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेमुळे अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवण्यातील धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
- कोलापटे यांची वॅगनार कार भाड्याने घेऊन त्याचे 37 हजार थकवले.
- ‘जेल कॅन्टीनचे काम देतो’ असे सांगून त्यांचा 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल हडपला.
- नातीच्या ‘शांती’चे कारण सांगून 1,110 रुपये रोख, 37 नारळ घेत त्याचेही पैसे दिले नाहीत.